| रायगड | प्रतिनिधी |
प्रस्तावित साईडोंगर-1 उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी गौरकामत ग्रामपंचायत हद्दीत यशस्वी पार पडली. ही सुनावणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्र मंडळाच्या रायगड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सुनावणीच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के होते. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी रुतूजा भालेराव होते.
टोरेंट पीएसएच-3 प्रा. लि. या कंपनीतर्फ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात प्रकल्पाचा उद्देश, तांत्रिक तपशील, पर्यावरणीय प्रभाव व व्यवस्थापन आराखडा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सादरीकरणात विशेषतः जल, वायू, ध्वनी या संदर्भातील शास्त्रीय अभ्यास नोंदविला गेला. 105 कोटी रुपयांचा पर्यावरण व्यवस्थापन आराखडा स्थानिक पातळीवर लागू केला जाणार आहे. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचा समावेश आहे.
काही ग्रामस्थांनी स्थानिक भागातील दुर्गमता, रोजगाराचा अभाव, आणि सोयी सुविधांचा अपुरा विकास यावर भर देत अशा प्रकल्पांची नितांत गरज असल्याचे अधोरेखीत केले. सुनावणीत काही हरकती प्राप्त झाल्या असल्या तरी त्या संयमपूर्वक ऐकून घेतल्या. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व कंपनीच्या प्रतिनिधींनी समाधानकारक उत्तरे दिली. रोजगार, महिला बचतगट, स्थानिक पुरवठा साखळी आणि सामाजिक विकासावर भर द्यावा अशी अपेक्षा प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांनी व्यक्त केली. हा प्रकल्प भविष्यात कर्जत, रायगड जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीस हातभार लावणारा ठरेल असा अनेकांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे सांगण्यात आले.







