लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा; पत्तन अभियंता यांना दिले निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील धूपप्रतिबंधक बंधार्याचे उर्वरित अपूर्ण अवस्थेत असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात न आल्यास याविरोधात ग्रामस्थांच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नौशाद दळवी यांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदन अलिबाग येथील पत्तन विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुरूड तालुक्यातील बोर्ली गावाच्या पश्चिमेकडील किनार्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार पत्तन विभागाकडून धूप प्रतिबंधक बंधार्याचे काम सुरू आहे. गेले चार महिने हे काम बंद स्थितीत आहे. ग्रामस्थांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आपणाकडे तसेच वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे समुद्रावर उतरण्यासाठी पायर्या न बांधल्यामुळे महिला, वृद्ध तसेच मच्छिमार बांधवांचे अतोनात हाल होत आहेत, तसेच हे काम निविदेनुसार केलेले नसून, मर्यादित काळात केलेले नाही.
तरी आपण संबंधित ठेकेदारावर विलंब आकार, निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाबाबत दंडात्मक कारवाई करावी. तसेच या सात दिवसांमध्ये उर्वरित काम सुरूवात करून निविदेनुसार करण्यात यावे, अन्यथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांचे उपस्थितीत बोर्ली ग्रामस्थांचा आक्रोश जनआंदोलन कार्यालयावर करण्यात येईल. याची नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे नौशाद दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंता, पत्तन विभाग बेलापूर यांना देण्यात आलेल्या आहेत.