हाय अलर्ट! दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी स्फोटके लपवल्याचा संशय

। मुंबई । प्रतिनिधी ।
आयएसआयच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी चार दहशतवाद्यांना अटक केल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यात हाय अलर्टचे आदेश जारी केले आहेत. गेल्या महिन्यात आयईडी टिफिन बॉम्बने तेलाचा टँकर उडवण्याच्या प्रयत्नानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. गेल्या 40 दिवसांत पंजाबमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलचा समावेश असलेला हा चौथा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी बुधवारी खुलासा केला की या प्रकरणात पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍यासह पाकिस्तानातील दोन दहशतवाद्यांचीही ओळख पटवण्यात आली आहे. यातील एका दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.

द हिंदुच्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होणार असून सणांचा हंगाम आणि आगामी विधानसभा निवडणुका पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील संवेदनशील जागांवर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी उच्चस्तरीय सुरक्षा तैनात करण्याचे निर्देश कॅप्टन अमरिंदर सिंग पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता म्हणाले की, पाकिस्तानस्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे प्रमुख लखबीर सिंग आणि कासिम या दहशतवादी मॉड्यूलच्या मागे आहेत. कासिम हा पाकिस्तानचा रहिवासी आहे तर लखबीर सिंग रोडे उर्फ बाबा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडा, थाना समलसर गावचा रहिवासी आहे आणि सध्या तो पाकिस्तानात लपला आहे. याशिवाय मंगळवारी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तान संबधित दहशतवाद्यांची ओळख रुबल सिंग रा. भाखा तारा सिंह, विक्की भुट्टी रा. बलहारवाल, मल्कीत सिंह रा. उगर औलख आणि गुरप्रीत सिंग उर्फ गोपी रा. उगर औलख अशी करण्यात आली आहे.

एका खून प्रकरणात रुबल याला पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास अंबाला येथून अटक केली होती. उर्वरित तिघांना अमृतसरच्या अजनाला गावातून पकडण्यात आले. त्याचा पाचवा साथीदार गुरुमुख ब्रारला 20 ऑगस्टलाच कपूरथला पोलिसांनी अटक केली. चार दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे. आरोपींनी अनेक ठिकाणी स्फोटके लपवल्याचा संशय आहे.

Exit mobile version