| रसायनी | प्रतिनिधी |
इरसाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून दुर्घटनेच्या कटु आठवणी जगत इरसाळवाडीचे नागरिक आपले जीवन जगत आहेत. डोंगराच्या कुशीत सोलर उर्जेवर प्रकाशमान होणारी इरसाळवाडी वर्षभरापूर्वी नेस्तनाबूत झाली होती. 45 कुटूंबाची हसती खेळती वाडी धरती मातेच्या कुशीत विसावली. आता ती इरसाळवाडी शासनाच्या पाठपुराव्यानुसार लवकरच उभी राहत आहे. दरडग्रस्तांच्या घराचे स्वप्न हे अंतिम टप्यात आले आहे. सिडकोद्वारे 44 घराचे बांधकाम हे पुर्णत्वाला आले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते घराचे वाटप करण्यात येणार आहे.
दरडग्रस्तांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौक येथील तात्पुरत्या कंटेनर वसाहतींना दोन वेळा भेट देत पुनर्रचनासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. इरसाळगडाच्या पायथ्याशीच नव्याने इरसाळवाडी उभी राहत असून त्यांच्या घराचे स्वप्न हे अंतिम टप्यात आले आहे. सिडकोद्वारे 44 घरांचे बांधकाम हे पुर्णत्वाला आले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील नामवंत कंपनी मेसर्स बी. जी. शिर्के कंन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड पुणे यांनी 44 घरांचे बांधकाम केले. शिवाय याजागी समाज मंदीर, अंगणवाडी, खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते आणि पाण्याचे योग्य नियोजन आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इरसाळवाडी दुर्घटनेकडे जातीने लक्ष दिले. शिंदे सरकारने इरसाळवाडी कुटुंबाची तात्पुरते स्थलांतर कंटेनर वसाहतीत करण्यात आल्यानंतर प्रशासनाने वर्षभर पूर्णपणे कुटुंब प्रमाणे त्यांची काळजी घेतली आहे. या ठिकाणी 24 तास पाणी, वीज आरोग्यसेवा, मोफत रेशन, मोफत गॅस सिलेंडर यासारख्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. शिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने 18 मुलांना दत्तक घेतले आहे.