सरकत्या जिन्याचा शुभारंभ, लिफ्टचीही सुविधा
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाचे रूप आता अधिकच आधुनिक होत आहे. नेरळ फलाट क्रमांक एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेला स्वयंचलित सरकता पायरी मार्ग (एक्सलेटर) शुक्रवारी सायंकाळी प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला. सरकता जिना सुरु झाल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांना याचा अधिक फायदा होणार आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात या सरकत्या जिन्याचा शुभारंभ मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते होणार होता. मात्र, त्यांचा नेरळ दौरा पुढे ढकलल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने स्वतःच हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. नेरळ रेल्वे स्टेशन रेल्वे प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
या स्वयंचलित शिडीमार्गामुळे आता प्रवाशांना, अंध अपंग नागरिकांना फलाटांदरम्यान सहज आणि सुरक्षितपणे ये-जा करणे अधिक सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या डब्याजवळ आणखी एक सरकता पायरी मार्ग बसवण्याचे कामदेखील रेल्वेकडून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे समजते. याच भागात प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली स्वयंचलित लिफ्टदेखील आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. लिफ्टच्या बाह्य भागावर दिलेल्या गुलाबी रंगाच्या शेडमुळे ती महिलांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. वयोवृद्ध, अपंग आणि महिला प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सायंकाळी सरकत्या पायऱ्या सुरू होताच प्रवाशांनी उत्साहाने त्यांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. गुलाबी रंगाच्या झळाळीने सजलेले लिफ्ट क्षेत्र आणि आधुनिक शिडी मार्गामुळे नेरळ स्थानक परिसरातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे.







