| नेरळ | प्रतिनिधी |
आगरी बोलीभाषा, आगरी संस्कृती आणि साहित्य यांचा वारसा जपण्याच्या तसेच तिचा प्रसार वाढवण्याच्या उद्देशाने ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ ही सामाजिक-साहित्यिक चळवळ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक तालुक्यात एक आगरी ग्रंथालय उभारून वाचन आणि लेखन संस्कृतीला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या चळवळीमागे युवा साहित्यिक सर्वेश तरे, गीतकार-संगीतकार दया नाईक, आगरी संस्कृती अभ्यासक व चित्रकार मोरेश्वर पाटील, तसेच साहित्यिक प्रकाश पाटील या चार जणांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आगरी समाजासाठी साहित्यिक चळवळीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या चळवळीचा पहिला टप्पा म्हणून 2020 मध्ये डोंबिवली (निलजे) येथे सर्वोदय महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून पहिले आगरी ग्रंथालय सुरू झाले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे ‘आगरी सेना’चे संपर्कप्रमुख मनोज साळवी यांच्या पुढाकारातून दुसरे ग्रंथालय सुरू करण्यात आले. आता कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पुढाकाराने आगरी ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून तिसरे आगरी ग्रंथालय कर्जत येथे सुरू होणार आहे. नेरळ येथील आगरी समाज सभागृहात रविवारी (दि.23) या तिसऱ्या आगरी ग्रंथालयाचा शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमात आगरी समाजातील साहित्यिक, कलाकार, अभ्यासक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथालयांद्वारे आगरी भाषेतील वायय, संशोधन आणि समाजजीवनाशी निगडित साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आगरी ग्रंथालय चळवळ सर्व आगरी साहित्यिकांना आवाहन करत आहे की, आपल्या प्रकाशित साहित्यकृतींच्या किमान तीन प्रती ग्रंथालयासाठी पाठवाव्यात, जेणेकरून हे साहित्य आगरी बोलीच्या जतन आणि प्रसारासाठी उपयुक्त ठरेल.







