समाज उन्नती मंडळाची स्थापना

| महाड | वार्ताहर |

कोकण भूमीत नावारूपास आलेल्या कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई संलग्न महाड, पोलादपूर, मंडणगड, दापोली या चार तालुक्याच्या विभागीय शाखा अध्यक्षपदी महाड तालुक्यातील शिरगांवचे नामवंत शाहीर बाळाराम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गेली अनेक वर्षे शाहिरी कलेच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तमाशा आणि जाखडी या पारंपरिक सांस्कृतिक नृत्य कलेतील गुरुवर्य, वस्ताद, शाहीर, ढोलकीपट्टू आणि नृत्य कलाकारांची सभा नुकतीच शिरगाव येथील गावदेवी कालभैरव मंदिर सभागृहात शंभू राजू घराण्यातील वरिष्ठ शाहीर बाळारामबुवा पवार आणि कुडूक येथील गुरु गणपती घराण्याचे वरिष्ठ शाहीर गणपतबुवा जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी तमाशा आणि जाखडी नृत्य कलेतील पारंपरिक व आधुनिक नृत्य कलेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा विनिमय करून या दोन्ही कलाप्रकारांना शासन दरबारी राजाश्रय मिळवून देण्यासंदर्भात मनोबल तयार करण्यात आले.

यावेळी मंडळाच्या महाड, पोलादपूर, मंडणगड, दापोली या चार तालुक्याच्या विभागीय शाखा उपाध्यक्षपदी सखाराम माळी, सरचिटणीस श्रीरंग रहाटवळ, सहचिटणीस सुभाष सापटे, खजिनदार विश्वास बटावले, सह खजिनदार प्रमोद चव्हाण तर कार्याध्यक्षपदी शाहीर गणपत जंगम यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी श्रीधर कदम, काशिराम लाखन, बाबाजी पिचूर्ले, संजय सुखदरे यांची निवड करण्यात आली. सदर सभेस शिरगांव, सव, चोचिंदे, आदिस्ते, बेबलघर, आदे, किंजळोली, दाभेकर कोंड, घुरूप कोंड, पारवाडी, धामणे, वामणे, आंबवडे, भोलोशी, कुडूक, तेरडी, तळेघर, घराडी, धुत्रोली, माहू, मंडणगड इत्यादी गावातील शाहीर व नृत्य कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version