प्रोटेक्ट जटायू प्रकल्प : गिधाडांसाठी वरदान

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या फणसाड अभयारण्यात गिधाडांची संख्या वाढावी, अधिवास वाढवा, यासाठी ग्रीन वर्क ट्रस्ट व फणसाड अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने गिधाड आहार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. आहार केंद्राच्या माध्यमातून अभयारण्य जंगलाच्या मध्यभागी मेलेली (मृत) जनावरे गिधाडांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला मृत जनावरे असल्यास त्याची तातडीने माहिती देण्याची विनंती लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

अभयारण्यातील गिधाडांना वाचवण्यासाठी व त्यांची संख्या वाढ होण्यासाठी प्रोटेक्ट जटायू ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रीन वर्क ट्रस्टचे सर्व सदस्य हे फणसाड परिसरात वास्तव्य करून आहेत. कोणाचाही फोन येताच ग्रीन वर्क ट्रस्टचे सदस्य हे मृत जनावर ताब्यात घेण्यासाठी जाणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी दरवर्षी जागतिक गिधाड जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. मुरुड ते म्हसळा असे हवाई अंतर 35 किलोमीटर क्षेत्रात असून एक गिधाड दिवसाला 100 किलोमीटरच्या परिक्षेत्रात फिरत असतो. मृत जनावरांचा वास गिधाडापर्यंत पोहचावा व गिधाडे पुन्हा फणसाड अभयारण्यात यावीत, यासाठी विशेष संकल्पना राबविण्यात येत आहे.

मृत जनावरे आढळून आल्यास तसेच प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी प्रकल्प जटायू यांच्याशी मोबाईल क्र.9096297059 ,8779409460 वर संपर्क साधावा, असे आवाहन फणसाड वन्यजीव अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

फणसाड अभयारण्यात गिधाडांची संख्या सद्यस्थितीत कमालीच्या संख्येने घटली आहे. आजुबाजूच्या परिसरातील लोकांनी सहकार्य केल्यास ही संकल्पना यशस्वी होणार आहे. गिधाडांची संख्या वाढून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे फणसाड अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले.

Exit mobile version