ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठित; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व मिशन अधिक परिणामकारक होण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिलेल्या आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लीटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, संस्थात्मक शौचालय यांचे बांधकाम व वापर याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 49 नुसार बनवलेली ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ही ग्रामपंचायतीची उपसमिती आहे. पाणी व स्वच्छता प्रकल्पाची आखणी, नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची असल्याची माहिती, डॉ. किरण पाटील व डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली आहे.
समितीची रचना
या समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सरपंच व सचिव ग्रामसेवक असतील.
पाणीपुरवठा व स्वच्छता या समितीमध्ये किमान 12 सदस्य व जास्तीत जास्त 24 सदस्य असतील.
समितीमधील एक तृतीयांश सदस्य ग्रामपंचायत सदस्यातून निवडलेले असतील.
या समितीत 50 टक्के महिला सदस्यांचा समावेश असेल.
गावपातळीवरील महिला मंडळ, युवा मंडळ, भजनीमंडळ, महिला बचतगट सहकारी संस्था इ. प्रतिनिधी असतील.
ग्रामस्तरीय शासकीय, जि.पं. ग्रामपंचायत कर्मचारी आमंत्रित व सहकारी सदस्य म्हणून निवड करता येईल त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
मागासवर्गीय समाजास योग्य प्रतिनिधित्व असावे.
प्रत्येक वॉर्ड किंवा वस्तीतील किमान प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.
ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती कर्तव्य:
गावातील सर्व कुटुंबांना प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे किमान 55 लीटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे.
पाणीपुरवठा योजनेचा गाव कृती आराखडा तयार करणे, गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांचे नियोजन रचना, संकल्पना, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणे.
पेयजल व स्वच्छतेबाबतच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीस वस्तुस्थितीदर्शक माहिती देणे.
गावाचा पेयजल सुरक्षा आराखडा तयार करणे.
पाणीपुरवठा योजनेच्या सर्व टप्प्यात व निर्णय प्रक्रियेत लोकसहभागाची खात्री करणे तसेच लोक वर्गणी (आर्थिक/ श्रमदान स्वरुपात) देण्याबाबत गावकर्यांना प्रोत्साहित करणे.
योजनेसाठी प्राप्त निधी बँक खात्यात जमा करून त्यांचे व्यवस्थापन करणे.
पूर्ण झालेल्या योजना कार्यान्वित करून त्यांचे दायित्व स्वीकारणे.
पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टी व अनामत रक्कम आकारणी व वसुली करणे.
कुटुंब कल्याण व पोषण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
त्रयस्थ संस्थेकडून होणार्या योजनेच्या तपासणी व कार्यक्षमता मूल्यांकनाची व्यवस्था करणे.
योजनांचे सामाजिक लेखा परीक्षण हाती घेणे.