युरो करंडक फुटबॉल स्पर्धा

इटलीचा निसटता विजय

। डॉर्टमंड । वृत्तसंस्था ।

सामना सुरू झाल्यानंतर 23व्या सेकंदास गोल स्वीकारल्यानंतर गतविजेता इटलीचा संघ वेळीच सावरला आणि त्यांनी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटात अल्बानियावर 2-1 असा निसटता विजय संपादन केला.

युरो करंडकच्या इतिहासात मुख्य फेरीत सर्वांत वेगवान गोल नोंदविण्याचा विक्रम अल्बानियाच्या नेदीम बाजरामी याच्या नावे नोंदीत झाला. त्याने रशियाच्या दिमित्री किरिचेन्को याने 2004 साली ग्रीसविरुद्ध 67व्या सेकंदास केलेल्या गोलला मागे टाकले. प्रारंभीच धक्का बसल्यानंतर लुसियानो स्पाल्लेट्टी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने खेळावर वर्चस्व राखले. पाच मिनिटांत दोन गोल नोंदवून त्यांनी 2-1 अशी आघाडी प्राप्त केली. 11व्या मिनिटास अलेस्सांड्रो बास्टोनी याने दोन वेळच्या विजेत्यांना बरोबरी साधून दिली. नंतर 16व्या मिनिटास निकोलो बारेल्ला याने केलेला गोल इटलीसाठी निर्णायक ठरला. सामन्याच्या इंज्युरी टाइममध्ये इटलीचा कर्णधार व गोलरक्षक जाईनलुईजी डोन्नारुम्मा हा रे मानाज याच्या फटक्यासमोर पूर्णतः चकला होता; परंतु चेंडू दिशाहीन ठरल्यामुळे अल्बानियाला बरोबरी साधता आली नाही.

सामन्याची स्वप्नवत सुरुवात
युरो करंडकच्या मुख्य फेरीत दुसर्‍यांदा खेळणार्‍या अल्वानियासाठी सुरुवात स्वप्नवत ठरली. इटलीचा लेफ्ट-बॅक फेडेरिको डिमार्को याच्या थ्रो-ईनचा नेम चुकला आणि त्याचा लाभ बाजरामी याने उठविला. अल्बानियाच्या खेळाडूने सणसणीत फटक्यावर इटलीच्या गोलरक्षकाला हतबल ठरविले. इटलीचा संघ जास्त वेळ पिछाडीवर राहिला नाही. गोल स्वीकारल्यानंतर दहा मिनिटांनी लॉरेन्झो पेल्लेग्रिनी याच्या शानदार क्रॉस पासवर बास्टोनीचे हेडिंग भेदक ठरल्याने अल्बानियाची आघाडी भेदली गेली. बारेला याने पेनल्टी बॉक्सच्या किंचित बाहेरून मारलेल्या फटक्यावर इटलीला सामन्यात आघाडी मिळवून दिली.
स्पेन, इटलीचे प्रत्येकी तीन गुण
स्पर्धेच्या ब गटात आता स्पेन व इटली यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. अगोदरच्या लढतीत तीन वेळच्या विजेत्या स्पेनने क्रोएशियाचा 3-0 असा धुव्वा उडविला. या गटातील पुढील लढतीत 19 जून रोजी क्रोएशिया व अल्बानिया यांच्यात, तर 21 जून रोजी स्पेन व इटली यांच्यात लढत होईल.
Exit mobile version