। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्तापक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी वाईट वागणूक मिळाल्याचे म्हटले आहे. शिवाय आपल्याला अडीच वर्षे मंत्रिपद दिले तरी नको, असे देखील ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरमध्ये रविवारी (दि.15) झाला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सत्तापक्षाचे आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, मंत्रिपदाच्या यादीमध्ये माझे नाव शेवटपर्यंत होते, परंतु, ऐनवेळी नाव बाद केल्यामुळे नाराजी नक्कीच आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कर्तृत्वावर जबाबदारी मिळायची. परंतु, आता आपण बिहारच्या दिशेने जात आहोत, असे दिसत आहे. कारण राज्यात बिहार प्रमाणे जातीयवादीपणा सुरु आहे. आता मला अडीच वर्षे मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवे होते, असा संताप शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.