पेण बाजार समितीचा प्रचाराचा प्रारंभ
| पेण | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले ते सोडून गेले. परंतु, पक्षाबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आम्हाला काही भिती नाही, असे ठोस प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी वाशी, ता.पेण येथे केले. वाशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात पेण बाजार समितीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आ.पंडित पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, नरेश ठाकूर, विकास म्हात्रे, प्रसाद पाटील, विकास पाटील, चैत्राली पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, अनंत पाटील, प्रदीप वर्तक, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, रायगड मध्यवर्ती बँकेचे संचालक अॅड. प्रभाकर पाटील, प्रकाश शिंगरुट आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मी माझ्या वैयक्तिक जीवनात एक गोष्ट पाळलेली आहे. ती म्हणजे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात राजकारण करायचे नाही. परंतु, पेणमध्ये आज सहकार क्षेत्रात जो राजकारण सुरु आहे तो योग्य नाही. पेणची कृषी उत्पन्न बाजार समिती मी स्वतः त्यावेळी काँग्रेसकडून खेचून आणली आणि आमच्या सहकार्यांच्या हातात दिली ती चुक केली का? ज्यांना पक्षाने मोठे केले ते सोडून गेले. परंतु, पक्षाबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्यासोबत आहे तो पर्यंत आम्हाला काही भिती नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाशीला आज सकाळच्या सत्रात आपण नारळ फोडत आहोत. तर दुपारी येथे भाजपवाले नारळ फोडणार आहेत. खारेपाटाचा केंद्रबिंदू हा वाशी असून, त्यामुळेच वाशी गावचे महत्त्व वाढले. माझी गेल्या दीड ते दोन महिन्यात दुसरी सभा या सभागृहात असेल. खारेपाटाचा आणि माझा वेगळा संबंध आहे. कधीकाळी खारेपाटातून मला विधानसभेची निवडणूक लढवायची होती. परंतू, आपल्या सहकार्याला ही जागा सोडली. ज्या चुका अगोदर झाल्या आहेत त्या पुन्हा होणार नसल्याचेही आ.जयंत पाटील यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रात जी मते आहेत ती फक्त आणि फक्त शेकापक्षाची आहेत. 251 मते 24 सहकारी संस्थांचे असून त्यातून 15 ते 16 चेअरमन आपल्याला भेटून गेले आहेत. ते आपल्याबरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. पूर्व विभागाचा विचार करता मी पूर्व विभाग सोडून दिला आहे. मी तिकडे जाणार ही नाही वादाचा मुद्दाच नको, असेही ते म्हणाले.
सोसायटीचे उमेदवार शेकापचे असतील तर इतर उमेदवार हे आघाडीचे असतील असे ठरले होते. परंतु, काही कारणास्तव उमेदवारी अर्ज बाद झाले. मात्र, आघाडीच्या मित्र पक्षाने घाबरायचे काम नाही. निवडणुका झाल्यावर पुन्हा एकदा आपण काही उमेद्वारांचे राजिनामे घेउन त्या जागी मित्र पक्षांच्या सहकार्यांना संधी देउ. शंभर टक्के विजय हा आपलाच आहे घाबरायची गरज नाही. एकजुटीन राहणे गरजेचे आहे.असे आ.जयंत पाटील म्हणाले.
शिक्षण क्षेत्राचा विचार केल्यास शिक्षण क्षेत्रात कधीही राजकारणाची किनार दिली नाही. पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिराचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा के.आर.पाटील माझ्याकडे आले आणि त्या भल्या गृहस्थाने मला सांगितले की, ही संस्था ताब्यात घ्या. मी ती संस्था ताब्यात घेउन पी.डी.पाटील यांच्या स्वाधीन केली. आज या संस्थेत साडेतीन हजार मुले शिकत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी सुप्रिया पाटील यांच्या हस्ते आई जगदंबा मातेची ओटी भरण्यात आली. पंडित पाटील यांनी आईच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ केला.