शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे
। अलिबाग | प्रतिनिधी ।
अभ्यास असो वा रोजचे खेळणे-बागडणे, मस्तीच्या दुनियेत नेहमीच रमणार्या विद्यार्थ्यांमध्ये आज वेगळाच उत्साह पहायला मिळाला. निमित्त होते आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे. जिल्हाभरातील शाळांमध्ये शुक्रवारी (दि.21) योगादिन साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या जोडीला शिक्षकही योगासनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विविध शाळांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांना योगांचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन योगाचे प्रशिक्षण घेतले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय योगा दिन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, नेहरु युवा केंद्र समन्वयक निशांत रौतेला, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, पोलीस विभागातील कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. दरम्यान, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येदेखील योगा दिन साजरा करण्यात आला.
सकाळी सात वाजता शाळेत हजर झाल्यावर विद्यार्थ्यांना एका सभागृहात एकत्र आणले. त्यानंतर त्यांना रांगेत बसवून योगाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी व काही संस्थांद्वारे करण्यात आला. मानवी आरोग्याच्या दृष्टीने योगाला प्रचंड महत्त्व आहे. योगा हे प्राचीन काळापासून असलेले व्यायामाचा प्रकार आहे. योगातून एकाग्रता निर्माण होण्याबरोबरच मानसिक व शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत होते. त्यामुळे धावपळीच्या युगात योगा महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. योगाचे फायदेही यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर योगाचे प्रात्यक्षिक धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. योगाचे वेगवेगळे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवून त्याचा नियमित वापर करण्याचा मोलाचा सल्लादेखील यावेळी देण्यात आला. रायगड जिल्हा परिषद शाळेसह जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी असे एक लाखाहून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योगासन अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण व्हावी, त्यांची मानसिक क्षमता वाढावी, यासाठी प्रत्येक शाळेतून योगाचे धडे देण्याचा प्रयत्न राहील.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
