रसायनीत प्रत्येक सैनिक एक पणती

| आपटा | वार्ताहर |
पुण्यातील लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून ‘प्रत्येक सैनिक एक पणती’ हा उपक्रम रसायनीत दि.21 ऑक्टोबर रोजी प्रिया स्कूलमध्ये संपन्न झाला. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी दिवाळीत हा कार्यक्रम केला जातो. आपल्या ‘उद्यासाठी’ सैनिक त्यांचा ‘आज’ देतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. कुटुंबापासून हजारो मैल लांब असणार्‍या सैनिकांसाठी प्रत्येकाने दिवाळीत एक तरी पणती लावावी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून त्यांना मानाचा मुजरा द्यावा, हा या मागचा उद्देश आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याहून निवृत्त कर्नल शरदचंद्र पाटील यांनी उपस्थित राहून ‘सियाचेनचे युध्दानुभव’ सादर करून सैनिकांच्या खडतर आणि थरारक जीवनाची ओळख करून दिली. त्यानंतर प्रिया स्कूलच्या पटांगणात 500 पणत्या लावून ही मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात विनोद सहस्त्रबुध्दे, प्रकाश कुलकर्णी, नागेश कदम, अनिल कणेरे, अनंत भालेराव, सुरेंद्र पावसकर, रवी ओंकार, बिना रेगे, वसुधा सहस्त्रबुध्दे या ‘लक्ष्य फाऊंडेशन’ आणि ‘प्रेरणा फॅमिली कट्टा’च्या सभासदांचा मोलाचा वाटा आहे.

Exit mobile version