मतदारांना ताटकळत राहण्याची वेळ
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनने गोंधळ घातला. कर्जत पालिका निवडणुकीत एकाच प्रभागात तब्बल चार वेळा ईव्हीएम मशीन बंद पडले. दरम्यान, सतत ईव्हीएम मशीन बंद पडत असल्याने मतदारांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्याचवेळी मतदानाचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कापडी मंडप किंवा पाणी तसेच दिव्यांग आणि वृद्ध मतदार यांच्यासाठी व्हीलचेअर यांची सुविधा देखील करण्यात आली नव्हती.
कर्जत नगरपरिषदमध्ये सदस्य पदाच्या 21 जागांसाठी आणि जनतेतून निवडून द्यायच्या थेट नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.2) मतदान पार पडले. कर्जत शहरात दहा प्रभागात ही निवडणूक पार पडली असून 29,957 मतदार असल्याने 33 मतदान केंद्र बनविण्यात आली. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर लगेच काही मिनिटात प्रभाग आठ आणि प्रभाग नऊ मधील प्रत्येकी एक मतदान यंत्रात बिघाड झाला. प्रभाग नऊमधील जिल्हा परिषद शाळा आकुर्ले येथील मतदान केंद्रात मतदान यंत्रात बिघाड झाला. त्याचवेळी कर्जत दहिवली भागातील रायगड जिल्हा परिषद शाळा येथील प्रभाग आठच्या मतदान केंद्रावर साडेदहा वाजेपर्यंत तीन वेळा मतदान यंत्र बंद पडले. त्याचा परिणाम मतदार हे साडेआठ वाजल्यापासून रांगेत उभे होते. शेवटी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास नवीन ईव्हीएम मशीन आणण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. परंतु, त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने त्याच ईव्हीएम मशीनमध्ये पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे प्रभाग आठमधील ईव्हीएम मशीन तिसऱ्यांदा बदलावे लागले.हे मतदान यंत्र बंद पडण्याचे सत्र सुरू असल्याने असंख्य मतदार हे ताटकळत रांगेमध्ये उभे होते.
ज्येष्ठ नारिकांची वानवा
कर्जत नगरपरिषदमध्ये दोन दिव्यांग मतदार यांची नोंद झाली. त्यामुळे त्या दोन मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली होती. परंतु, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था कोणत्याच मतदान केंद्रावर करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रांवरील मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रशासनांनी भंगार मशीन पाठवल्या आहेत. त्या बंद पडत असल्याने मतदारांना रांगेत उभे राहण्याचा त्रास हा सहन करावा लागत आहे. तर ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांची बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व व्हिलचेअरची गैरसोय पहाता, निवडणुक अयोगाचा गलथान कारभार समोर आला. या संदर्भात कर्जत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
माजी आमदार
सुरेश लाड
मतदान केंद्रावर जो काय भोंगळ कारभार पहायला मिळाला याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. मतदार मतदानासाठी येऊनही मतदानंकेंद्रावर मतदान न करता माघारी फिरले. त्यामुळे पुढे तरी प्रशासनाने मतदारांना वेळ वाढवून द्यायला हवी होती.
नितीन सावंत,
जिल्हाध्यक्ष, ठाकरे गट
