युपीमध्ये माजी राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा

। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत युपी पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपमानास्पद टीका केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कुरैशी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. युपी पोलिसांनी असं म्हटलं की, रामपूर जिल्ह्यातील सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते आकाश सक्सेना यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कुरैशी विरोधात गुन्हा दाखल केला गेला. माजी राज्यपालांवर देशद्रोह (124 ए), धर्म आणि जातींमध्ये तणाव वाढवल्याच्या आऱोपाखाली कलम 153 ए आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला आव्हान देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी 153 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितलं की, सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, कुरैशी हे माजी मंत्री आजम खान यांच्या घरी आमदार तंजीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री योगी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना ही रक्त पिणार्‍या राक्षसासोबत केली होती. सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं की, कुरैशी यांचे वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकते आणि दंगलही होऊ शकते.

Exit mobile version