| माणगाव | वार्ताहर |
शहरात मोफत नेत्र शिबिर पार पडले. या शिबिरात सुमारे 160 रुग्णांची तपासणी करण्यात आली, तसचे 75 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णांना दृष्टी मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक विजय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत शिबिर पार पडले. वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांच्या सभागृहात सकाळपासूनच रुग्णांनी गर्दी केली होती. शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. सदर शिबिराला अध्यक्ष प्रदीप गांधी व मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत शहा यांनी भेट देऊन या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी विजय मेथा यांचे कौतुक केले. मेथा यांनी गांधी आणि शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गेल्या वर्षभरापासून माणगावमध्ये शिबिरे भरवण्यात येत आहेत. आतापर्यंत 1250 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मेथा हे समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत असल्याने ते अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम माणगाव तालुक्यात राबवित असतात. नेत्ररोग शिबिराला दरमहिन्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण रायगडातील माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, रोहा आदी तालुक्यांतील रुग्ण शिबिराचा लाभ घेत आहेत. आजची महागाई पाहता गरिबांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. सामाजिक बांधिलकीतून आपण हे समाजकार्य करीत आहोत. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबीर राबविणार असल्याचे मेथा यांनी यांनी सांगितले.
सदर शिबीर आयोजित करण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सुप्रिया शिंदे, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे पथक, व्यवस्थापक डॉ. प्रकाश पाटील, डॉ. केरवी, कीर्ती परब, अर्पिता जाधव, ज्ञानेश्वर कांबळे, हिरामण पाटील यांनी सहकार्य केले. सदर शिबीर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ समाजातील गरीब-गरजू नेत्र रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन विजय मेथा यांनी केले आहे.







