जिल्ह्यातील सात आमदारांची सत्वपरीक्षा

महाड विधानसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक 94 ग्रामपंचयती; पनवेलमध्ये सर्वात कमी दहा ग्रामपंचायती

| म्हसळा | वार्ताहर |

मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सात आमदारांची कसोटी लागणार आहे. यामध्ये सर्वात जास्त 94 ग्रामपंचायतीची जबाबदारी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या (शिंदे गट) पक्षप्रतोद महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यावर, तर सर्वात कमी दहा ग्रामपंचायती पनवेलचे भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्यावर आहे.

दरम्यान, अलिबागचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे गट) आ. महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात 11 ग्रामपंचायती, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांच्या मतदार संघात 21, पेण मतदारसंघातील भाजपचे आ. रवींद्र पाटील यांच्या मतदारसंघात 40, श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. आदिती तटकरे यांच्या मतदार संघात 46, भाजपला पाठिंबा देणारे उरणचे अपक्ष आ. महेश बालदी यांच्या मतदार संघात 18 ग्रामपंचायतींचा मतदारसंघनिहाय समावेश आहे. अद्यापही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नजीकच्या काळात त्या निवडणुकांचा कार्यक्रमसुद्धा निश्‍चित होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम सुरू झाल्याने ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत.

या ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबरला, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आहे. सरपंचपदाच्या थेट निवडणुकींमुळे जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी वाढणार आहे.

निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायती
अलिबाग तालुक्यातील 6, उरण 18, कर्जत 7, खालापूर 14, तळा 1, पनवेल 10, पेण 26, पोलादपूर16, महाड 73, माणगाव 19, मुरुड 5, म्हसळा 13, रोहा 5, श्रीवर्धन 13, सुधागड 14 आशा 240 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Exit mobile version