निसर्ग चक्रावर परिणाम
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा तर र्हास होतोच. परंतु त्याचबरोबर या उत्खननाचा परिणाम पावसाळ्यात अनेक पक्षी, कीटक आणि इतर वन्यजीवांवर होत आहे. शिवाय वृक्ष उन्मळून पडल्यामुळे अनेक पक्षांचा अधिवास व खाद्य नष्ट झाले आहे. अशा नोंदी येथील निसर्ग व पशुपक्षी अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत.
माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी यासंदर्भात नुकतेच सर्वेक्षण केले. विळे, पाटणूस भागाड परिसरात भटकंती करताना त्यांना अनेक ठिकाणी डोंगर पोखरलेले दिसले. राम मुंडे यांनी सांगितले की, या मुरमाड किंवा मातकट टेकड्यांवर अनेक झाडे वर्षानुवर्षे बहरत असतात. विशेष म्हणजे स्थानिक परिस्थितीशी व वातावरणाशी सुसंगत अशी जैवविविधता असल्याने विशिष्ट झाडे या भागात असतात. पावसाळ्यात या झाडांवरती कावळे, कोतवाल, नारंगी कस्तुर, नाचण, ठिपकेवाला होला असे वेगवेगळे पक्षी घरटी बांधतात. तर, मुंग्या किंवा वाळव्या झाडांच्या सानिध्यात वास्तव्य करत असतात. या झाडांच्या खोडावरील सालींमधे अनेक कीटक अंडी देऊन आपली जीवनप्रक्रिया पुढे चालू ठेवत असतात. तर, झाडांच्या मुळांपाशी मुंग्या व वाळव्या आपले वारूळ (घर) बांधून संपूर्ण पावसाळ्यात पुरेल एवढा अन्नसाठा त्या वारुळात साठवून ठेवत असतात. यांच्याच जोडीला पावसाळ्यात अनेक सरपटणारे जीव जसे, सरडे, पाली, साप, घोरपड हे याच भागात अंडी देत असतात तर विंचू, खेकडे, गोगलगाई, चोपई अशा प्रकारच्या जीवांचे सुद्धा याच भागात वास्तव्य असते. पांढर्या छातीचा धीवर (खंड्या) पक्षी, तिबोटी खंड्या पक्षी, सामान्य धीवर पक्षी, नीलकर्ण किलकिला खंड्या पक्षी हे याच भागातील मातीमध्ये बीळ बनवून आपली घरटी तयार करून पिल्लांची वाढ करत असतात.
परंतु, अनेक ठिकाणी इमारत व घर बांधकाम, रस्ते व भराव यासाठी दगड, खडी, मुरूम किंवा मातीचा उपयोग केला जातो. मग हे दगड खडी, माती किंवा मुरूम मिळवण्यासाठी डोंगर किंवा टेकड्या पोखरल्या जात आहेत. हि बाब गंभीर व चिंताजनक असून निसर्गचक्रामध्ये याचा प्रतिकूल दीर्घ दीर्घकालीन परिणाम होताना दिसत आहे.
उत्खननामुळे कळत नकळत जैवविविधता, पर्यावरण व निसर्गात अनेक बदल होत चालले आहेत. त्यामुळे वेळीच यावर योग्य व ठोस उपयोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून येथील पशुपक्षी सूक्ष्मजीव व निसर्ग चिरकाल टिकेल.
राम मुंडे, पर्यावरण व पशुपक्षी अभ्यासक