पुलाच्या नावाखाली द्रोणागिरीला सुरुंग; हजारो वृक्षांची कत्तल
| उरण | प्रतिनिधी |
करंजा-रेवस पुलाच्या बांधकामासाठी ऐतिहासिक, पौराणिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी सध्या जोरदार उत्खनन सुरू आहे. या कामामुळे केवळ आदिवासींचे अस्तित्वच नव्हे, तर संपूर्ण निसर्गसंपदेवर घाला घातला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या उत्खननातून द्रोणागिरी परिसरातील हजारो वृक्षांची कत्तल होण्याचा धोका निर्माण झाला असून शेकडो वर्षांची हरित संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत हा केवळ डोंगर नसून तो रामायणकाळाशी जोडलेला पवित्र परिसर आहे. रामायणात उल्लेख असलेली संजिवनी बुटी याच द्रोणागिरी पर्वतावर असल्याचा उल्लेख पुराणात आहे. लक्ष्मणाच्या प्राणरक्षणासाठी हनुमानाने संपूर्ण पर्वत उचलून नेल्याची कथा आजही भारतीय संस्कृतीत जिवंत आहे. अशा पवित्र भूमीवर आज विकासाच्या नावाखाली बुलडोझर फिरवले जात आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आणि जैविकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजाती आढळतात. मात्र, कोणताही सखोल पर्यावरणीय अभ्यास, जैवविविधता अहवाल किंवा स्थानिक ग्रामसभेची परवानगी न घेता उत्खनन सुरू करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी, आदिवासी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यामुळे पर्यावरण कायदे, वनसंवर्धन कायदे आणि आदिवासी हक्क कायद्यांची पायमल्ली होत असल्याचा थेट आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यावेळी, ग्रामस्थ आणि आदिवासी संघटनांनी, द्रोणागिरी परिसरातील उत्खनन तात्काळ थांबवावे. हजारो वृक्षांच्या संभाव्य कत्तलीला आळा घालावा. दुर्मीळ औषधी वनस्पतींचे संरक्षण करावे आणि आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट लेखी धोरण जाहीर करावे. अन्यथा जनआंदोलन छेडू, असा स्पष्ट इशारा संबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे.
आदिवासी समाज भीतीच्या सावटाखाली
या उत्खननाच्या मार्गावर करंजा आदिवासी वाडी असून सुमारे 150 वर्षे हा समाज येथे वास्तव्यास आहे. उत्खननामुळे डोंगर उतार कमकुवत होत असून आदिवासींच्या घरांना तडे जाण्याचा, भूस्खलन होण्याचा आणि त्यातून थेट जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक सतत भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, विश्वासात न घेता हे उत्खनन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, हा विकास आमच्या प्राणांवर बेतणार का, असा थेट सवाल आदिवासी करत आहेत.







