वन विभाग सुस्त, झाड मुळापासून नष्ट करण्याचे सत्र
| नेरळ | प्रतिनिधी |
कोणत्याही परवानाविना लाल माती काढणार्यांकडून डोंगर पोखरले जात असताना असंख्य जुनी झाडे मुळापासून नष्ट होत आहेत. तर, आता लाल मातीसाठी भीमाशंकर अभयारण्य भागातील जमिनीवर धडक दिली असून, वन विभाग सुस्त आहे. दरम्यान, लाल माती तस्करीवरील कारवाईनंतर नवी मुंबईत माती पाठवण्यासाठी दबाव वाढला असून, शेतकरी देणार नसतील तर वन क्षेत्रात जाऊन लाल माती उकरून काढण्यासाठी आणि बेकायदा वाहतूक करण्याकडे या मातीतस्करांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्जत तालुक्यातून चोरीला जात असलेली माती आणि त्या मातीमुळे डोंगर पोखरले जाण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहेत. कर्जत तालुक्यातील जमिनीमध्ये असलेली लाल माती ही नवी मुंबई आणि अन्य भागात मैदाने विकसित करण्यासाठी विशेष पसंती दिली जाते. त्यामुळे तालुक्यातील खांडस, ओलमन, नांदगाव आणि पाथरज ग्रामपंचायतीमधून लाल मातीचे उत्खनन करण्याकडे मातीमाफियांचे प्रयत्न सुरू होते. त्यात स्थानिक पातळीवर शेतकर्यांच्या जमिनी घेऊन माती काढली जात होती, परंतु शेतकर्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठे असून, लाल माती काढून देणारे मालामाल झाल्याचे दिसून आले आहे. तर कर्जत तालुक्याच्या बाहेरील हायवा गाड्या या लाल माती नेण्यासाठी कर्जत तालुक्यात रात्रीच्या अंधारात येतात आणि माती भरून वाहतूक करतात. त्यामुळे शेतकर्यांची मोठी फसवणूक होत असून, कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत तहसीलदार यांच्याकडून झालेल्या कारवाईनंतर फसवणूक झालेले शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.
शेतकर्यांकडून विरोध होऊ लागल्याने लाल माती काढण्यासाठी या माफियांकडून आता भीमाशंकर अभयारण्य भागाला लक्ष्य केले जात आहे. या भागाकडे पाहायला वन विभाग जागेवर नसल्याने लाल मातीच्या त्या जमिनी जवळच्या वाटू लागल्या आहेत. त्यात लाल मातीचे उत्खनन करणारे हे लोक त्यासाठी झाडेदेखील जमिनीपासून वेगळी करण्याचे काम केले जात आहे. नांदगाव ग्रामपंचायतीमधील शेवटच्या टोकाच्या गावांना लागून भीमाशंकर अभयारण्य असून, त्यालगत लाल मातीचे डोंगर आता फोडले जात आहेत. अभयारण्य भागाची देखरेख करणारे वन विभाग यांचे कार्यालय हे पुणे जिल्ह्यात असल्याने लाल माती उत्खनन करणारे यांची चांदी झाली आहे. परंतु, यामुळे वनसंपदा धोक्यात आले आहे.