जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई कमी

पावसाळ्यात माती वाहून जाण्याची शक्यता
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील डावली रांजणखार आणि मिळखतखार गावासाठी जलजीवन अंतर्गत नव्याने पाणी योजना राबविण्यात येत आहे. या कामासाठी सध्या मिळकतखार, डावली रांजणखार आणि सारळ परिसरात रस्त्याच्या कडेला जलवाहिनी भूमीगत टाकण्यासाठी खोदाई सुरू आहे. परंतु, या खोदाईची खोली कमी असल्याने पावसाळ्यात माती वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यालगत वसलेल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई असते. बहुतांश जुन्या विहिरी वापरात नाहीत. ज्या विहिरीत पाणी आहेत, ते पाणी पिण्यासाठी मचूळ आहे. ऐन उन्हाळ्यात तर विहिरी आणि विंधनविहिरीदेखील तळ गाठतात. परिणामी, टँकर किंवा एमआयडीसीच्या पाण्याची प्रतीक्षा गावकर्‍यांना करावी लागते. यापैकी दोन्ही पर्याय वेळेवर उपलब्ध न झाल्यास विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.

तालुक्यातील सारळ, रेवस मिळखतखार, डावली रांजणखार, बोडणी या गावांतील लोकांना गेली अनेक वर्षे या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाने जलजीवन अंतर्गत मिळखतखार, डावली-रांजणखार या दोन गावांना पाणी देण्यासाठी सारळ ग्रामपंचायत हद्दीत नवीन विहिरीचे स्रोत निर्माण करण्यात आले. त्या विहिरीचे पाणी या दोन ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे.

त्यासाठी सध्या जलवाहिनी भूमीगत टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. परंतु, खोदाईची खोली फारच कमी आहे. काही ठिकाणी एक फूटसुद्धा खोदाई नाही. मोठे वाहन रस्त्याच्या कडेने गेल्यास या जलवाहिनीला धोका होऊ शकतो. पावसाळ्यात माती वाहून जाण्याचीदेखील शक्यता आहे. याआधी टाकलेली जलवाहिनी मागच्या पावसात माती वाहून गेल्याने वर आली. सांडपाण्याच्या नाल्यातून टाकलेल्या या जलवाहिनीमुळे पाणी तुंबून रस्त्यावर येणाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेळीच याकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष देऊन भविष्यात गावकर्‍यांना होणारा त्रास दूर करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Exit mobile version