मँग्रोजची सर्रास बेसुमार कत्तल

वन आणि महसूल खात्याचे दुर्लक्ष
। पेण । वार्ताहर ।
शिर्की गावातील शेतकरी रमाकांत गोविंद पाटील यांनी गेली दोन वर्षे वारंवार महसूल खात्याकडे व वनखात्याकडे मँग्रोजतोडीबद्दल लेखी तक्रार केली आहे. परंतु, वन आणि महसूल खात्याकडून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात आहे.
बोरी हद्दीतील सर्वे क्रमांक 152 हा रमाकांत पाटील यांच्या शेतीला लागून असून, सर्वे क्र.152 हा सरकारी आकादेवी बोरी ट्रस्ट यांचे खांजण (कोठा) असून, तेथील मँग्रोजची तोड करून ग्रुप ग्रामपंचायत शिर्की तेथे बांधकाम करत आहेत. या बांधकामामुळे रमाकांत पाटील यांच्या शेतीत पाणी तुंबून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उन्हाळ्यात भरती-ओहोटीचे पाणी व पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून पूर्णतः शेती नापिक होईल, असेही आपल्या तक्रारी अर्जात रमाकांत पाटील यांनी नमूद केले आहे.
रमाकांत पाटील यांचे उपजीविकेचे साधन शेतीच असल्यामुळे शेतीच पिकली नाही तर पूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी सर्वे क्र. 152 मध्ये केलेल्या भरावाविरूद्ध व मँग्रोजतोडीविरुद्ध ठोस कारवाइची मागणी त्यांनी केली आहे. तसेच यातील जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे रमाकांत पाटील यांनी ठरविले आहे.

पुन्हा एक अर्ज
यापूर्वी रमाकांत पाटील यांनी 8 नोव्हेंबर 2020, 19 नोव्हेंबर 2020, तसेच 9 मार्च 2022 रोजी तक्रारी अर्ज केले आहेत. मात्र, त्याकडे शासनामार्फत दुर्लक्ष झाला आहे. म्हणून नव्याने 15 मार्च रोजी तहसील कार्यालयात पुन्हा एकदा न्याय मिळावा म्हणून तक्रारी अर्ज केला आहे. याबाबत ग्रामसेवक शिर्की यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version