pezari news! एमजीएम रुग्णालयातून मृतदेहांची अदलाबदली; अंत्यसंस्कारापूर्वी रुग्णालयातून फोन

मृतदेह घरी नेल्यानंतर रुग्णालयातून फोन; पेझारी, सोमाटणे येथील नातेवाईकांचा संताप

। पनवेल । दीपक घरत ।
नावासह चेहर्‍यातही साम्य असल्याने एका व्यक्तीचा मृतदेह दुसर्‍याच व्यक्तीच्या नातेवाईकांना दिल्याचा प्रकार कामोठे येथील एमजीएम (MGM Hospital) रुग्णालयात मंगळवारी (दि.27) घडला. मृतदेहाची बदली झाली असल्याचे दुसर्‍या व्यक्तीच्या नातेवाकांच्या लक्षात आल्याने अलिबाग येथील पेझारी गावात नेण्यात आलेला मृतदेह परत मागवण्याची वेळ एमजीएम रुग्णालय प्रशासनावर आली.

प्रकृती अस्वस्थेमुळे अलिबाग येथील पेझारी येथे राहणारे रमाकांत पाटील यांना सोमवारी (दि.26) कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर रात्रभरासाठी पाटील यांचे शव रुग्णालतील शीतगृहात ठेवण्याचा निर्णय रमाकांत पाटील यांच्या नातेवाईकांनी घेतला. याचवेळी शीतगृहात पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील राम पाटील यांचादेखील मृतदेह ठेवण्यात आला होता.

दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.27) पेझारी येथील रमाकांत पाटील यांचे नातेवाईक शीतगृहातील मृतदेह घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी शीतगृहातील कर्मचार्‍याने दोन्ही मृत व्यक्तींच्या नावाच्या सुरवातीला असलेल्या आर या इंग्रजी आद्यक्षराने उडालेल्या गोंधळातून सोमाटणे येथील राम पाटील यांचा मृतदेह पेझारी येथील रामकांत पाटील यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला. चेहर्‍यात साम्य असल्याने नातेवाईकांच्या देखील ही बाब लक्षात आली नाही. ते रमाकांत यांच्या ऐवजी राम यांचा मृतदेह घरी घेऊन गेले. त्याच वेळी राम पाटील यांचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना शीतगृहात असलेला मृतदेह राम यांचा नसल्याचे लक्षात आल्याने राम यांच्या नातेवाईकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान, पेझारी येथे घेऊन जाण्यात आलेल्या मृतदेहाच्या अंतिमसंस्कारची तयारी पूर्ण झालेली असतानाच मृतदेह बदली झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून फोनद्वारे रमाकांत यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यावेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. रमाकांत समजून घरी नेण्यात आलेला राम यांचा मृतदेह पुन्हा एमजीएम रुग्णालयात आणून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला तर रामकांत यांचा मृतदेह अलिबाग येथील त्यांच्या घरी नेण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे एमजीएम रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून नकार
एमजीएम रुग्णालय प्रशासनाकडून मात्र या प्रकरणाला दुजोरा देण्यात आला नसून मृतदेह देताना शहानिशा केली जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच मृतदेह बदली झाल्याचा प्रकार शीतगृहातच लक्षात आल्याने तात्काळ चुक सुधारण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Exit mobile version