| दापोली | वृत्तसंस्था |
दापोली तालुक्यातील भोंमडी येथे फुगीची नदी या ठिकाणी जलमय भागात सात जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे गावठी बॉम्ब प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले होते की घातपाताचा काही कट रचला जात होता, याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
भोंमडी-निकमवाडी येथे राहणारे संतोष काणेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार रात्री 10.30 च्या सुमारास भोंमडी येथील फुगीची नदी या ठिकाणी जंगलमय परिसरात कोणीतरी अज्ञात इसमाने सात जिवंत गावठी बॉम्ब रस्त्यात पेरून ठेवलेले होते. या अज्ञात इसमाने मानवी जीवास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने या बॉम्बची पेरणी केलेली आढळून आली. हे बॉम्ब जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बॉम्बची किंमत सुमारे 7 हजार असून, अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.