रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्साहात; दोन वर्षांनंतर वाजत गाजत मिरवणूका

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन वर्षे प्रतिबंध असल्याने नारळी पौर्णिमा उत्सव शांततेत करावा लागला होता. त्यानंतर यंदा प्रथमच रायगड जिल्ह्यातील सागरकिनारी मोठया उत्साहात वाजत गाजत आणि पारंपारिक नृत्याचा फेर धरीत रायगड जिल्ह्याती मच्छिमार बांधवानी सोन्याचा नारळ दर्या राजाला अर्पण करीत शांततेचे आवाहन केले. या उत्साहामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर उत्साहाची भरती पहायला मिळाली.

रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा हे एकाच दिवशी येणारे दोन सणाला कोकणात उत्साहाचे उधाण येते. दीड दोन महिने मासेमारीला बंदी असल्याने मच्छिमार बांधव आपल्या नौका किनार्‍यावर लोटून शाकारुन ठेवतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रतिकात्मक सोन्याचा नारळ मिरवणूकीने समुद्रकिनारी आणून मोठया भक्तीभावाने दर्या राजाला अर्पण करीत त्याची करुण भाकून शांततेचे आवाहन करतात. तसेच कोकणात या दिवशी सकाळी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. त्यानंतर नारळ फोडण्याच्या स्पर्धा सुरु होतात. सकाळपासून रात्रीपर्यंत या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा परिसरात नारळ हाताने फेकून दुसर्‍या बाजूने त्याच्यावर वार करुन स्पर्धा घेतली जाते. तर अलिबाग परिसरात हातात नारळ घेऊन प्रतिस्पर्धी आपल्याकडील नारळाने आपटून फोडतो. गल्लोगल्ली अशा प्रकारच्या स्पर्धा पहायला मिळत होत्या. तर काही ठिकाणी बक्षिसांची बरसात करीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग कोळीवाड्यातून सायंकाळी सजवलेल्या सोन्याच्या नारळाची वाजतगाजत मिरवणूक काढून नाचत गाजत समुद्रकिनारी आणण्यात आली. यावेळी कोळी समाजातील लहानथोर, महिला पुरुष आपल्या पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. समुद्रावर आल्यानंतर नारळाची आरती करण्यात आली. त्यानंतर त्योच विसर्जन करण्यात आले. यावेळी चिंतामण भगत, गाव पाटील प्रल्हाद पाटील, विश्‍वनाथ पेरेकर, सुकूमार भगत, राजन तांडेल, पांडूरंग भगत, प्रशांत पोरे, विशाल बना, विजय भगत, प्रविण तांडेल आदी सहभागी झाले होते.

Murud

Panvel

Uran

Exit mobile version