महिलांसाठी विशेष! सध्याचे भाज्यांचे दर जाणून घ्या

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार, शिमला मिरची, हिरवी मिरची, फरसबी, कारली या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसत आहे. परिणामी एपीएमसीत उच्चतम दर्जाच्या भाज्या कमी असून त्याला जास्त मागणी आहे. तसेच सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने भाज्यांना मागणी आधीक आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात 10-20रुपयांनी वाढ झाली आहे. भाज्यांच्या दर वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.

बाजारात सोमवारी 687 गाड्यांची आवक झाली असून यामध्ये टोमॅटो, कोबी, काकडी, भेंडी, वांगी या भाज्यांचे दर स्थिर आहेत; तर हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार, शिमला मिरची, हिरवी मिरची, कारली, फरसबी या भाज्यांच्या दारांनी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात हिरवा वाटाणा आधी 120 ते 130 रुपयांवरून आता 140-160 रुपयांवर तर गवार 40-45 रुपयांवरून 60-65 वर, हिरवी मिरची 33 ते 40 रुपयांवरून 46 ते 48 रु. तर शिमला मिरची 40 ते 45 रुपयांवरुन 60 रुपयांवर विकली जात आहे. तसेच आधी फ्लावर 15 ते 20 रुपयांनी उपलब्ध होता. तो आता 22 ते 24 रुपयांनी विकला जात तर कारली 18 ते 20 रुपयांवरून 22 ते 24 रुपयांवर आणि फरसबी 40 ते 45 वरून 60 ते 65 रुपयांवर गेले आहे.

तेच किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा 180 ते 200 रुपये किलो तर गवार, शिमला मिरची आणि फरसबी 80 रु, कारली आणि फ्लॉवर 40 ते 50 रुपये तर हिरवी मिरची 60 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे.

Exit mobile version