। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण रेल्वे मार्गे रेल्वे प्रवास करणार्या प्रवाशांना विमानतळावर मिळणार्या विश्रांतीसाठीच्या सेवेप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर आठ ठिकाणी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज उभारली जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गे धावणार्या गाड्यांमधून प्रवास करताना स्टेशनवर प्रवाशांना वातानुकूलित कक्षात थांबता यावे, यासाठी कोकण रेल्वेने रेल्वेच्या प्रवाशांसाठी विमानतळावर मिळणार्या सुविधेप्रमाणे एक्झिक्यूटिव्ह लाउंज म्हणजेच विशेष अतिथी कक्ष उभारण्याचे धोरण स्वीकारले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच खेड, चिपळूण तसेच दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरदेखील विशेष अतिथी कक्ष सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी स्थानकावर या विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा उपस्थित होते.
या स्थानकांवरही उभारणार एक्झिक्यूटिव्ह लाऊंज
यापूर्वी काही ठराविक स्थानकांवर पुरवण्यात आलेली विशेष कक्षाची सुविधा आता कोकण रेल्वे आणखी काही स्थानकांवर पुरवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यानुसार माणगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, करमाळी, भटकळ, कारवार तसेच मुर्डेश्वर ही रेल्वे स्थानके यासाठी निवडण्यात आली आहेत.