गृहोद्योगाद्वारे दाखविले अस्तित्व

प्रतीक कोळी
। अलिबाग । वार्ताहार ।

परीतक्ता भारतीय समाजातील पतीपरमेश्‍वराला सर्वस्व मानून जगणार्‍या एखाद्या स्त्रीसाठी हा शब्द म्हणजे विषमात्रेसमानाच. त्यातही विकसन प्रक्रियेत प्रवेश करत महासत्ता बनू पाहणार्‍या भारतातील तथाकथित समाजात एखाद्या परितक्ता युवतीने जगणे, फार सोपे नाही. सासरचा संबंध तुटल्यानंतर माहेरचाही लग्नापूर्वीसारखा आधार नसताना पुरूषप्रधान समाजात एखाद्या परितक्ता युवतीने गृहोद्योगाद्वारे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, ही फार मोठी बाब आहे. नवदुर्गा सदरेच्या अंतिम पर्वात अशाच एका नवदुर्गेची कहाणी प्रस्तृत करीत आहोत.
एका अंधारलेल्या रात्री कौटुंबिक वैमनस्यातून जेव्हा एका विवाहितेला तिच्या चिमुकल्या मुलींसह नवरा कायमचे घराबाहेर काढतो तेव्हा अंर्तबाह्य दडलेल्या काळाशार अंधाराला भेदण्याचा संघर्ष करणार्‍या आणि त्यामधून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्‍या कृषीवल नवदुर्गा आहेत, अलिबाग तालुक्यातील कुरूळ ग्रामपरिसरात राहणार्‍या सायली राऊळ. सद्यःस्थितीत स्थानिक परिसरता अन्नपूर्णा, समासेविका आणि कवियित्री अशी त्यांची ओळख आहे.

शालेय जीवनापासून पाककला, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे ही त्यांची आवड होती. त्यांच्या संघर्षकाळात त्यांची हीच आवड, त्यांचे हेच कसब त्यांना रोजगारासाठी सहाय्यभूत ठरले. संसार मोडल्यामुळे माहेरी आल्यानंतर स्वावलंबी होण्याचे त्यांनी निश्‍चित केले. पापड, कुरडया अशा वाळवणचे पदार्थ बनविणे आणि त्यांची विक्री करणे, या घरगुती पातळीवरील विरंगुळ्यासाठी निर्मिलेल्या रोजगाराची कल्पना त्यांना होतीच. याचाच आधारे त्यांनी पुढे जाण्याचे ठरविले आणि आपला वर्धिनी गृहोद्योग सुरू केला. याद्वारे वाळवणाचे खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, लग्न-बारसे-पूजा आदी सोहळ्यांमधील अन्नपदार्थांची निर्मिती,विक्री करून त्यांनी आपला रोजगार उभा केला.
या गृहोद्योगाच्या प्रारंभी तान्ह्या मुलीला कडेवर, दुसर्‍या मुलीला हाताला धरून निर्मिलेला मालाची विक्री करणे, विविध ठिकाणी पोच करणे हे कठीण गेले. शिवाय एकटी युवा स्त्री म्हणजे पुरूषांसाठी संधी, हीच मानसिकता असलेल्या भोगवादी समाजात धावपळ करणे, सापे नव्हते. पण त्या हरल्या नाही, डगमगल्या नाहीत. खंबीरपणे लढा दिला. आपल्या दोन मुलींना शिक्षण देण्यासोबतच आदर्श मुल्यसंस्कारांचे धडे दिले.शासनाच्या जीवनज्योती ग्रामसंघाचे नेतृत्व करताना विविध महिला बचत गटांद्वारे त्यांनी महिलांना आर्थिक बळ मिळवून देत उद्योग-व्यवसाय स्वरूपाचा स्वनिर्मित रोजगार उभारणीत मदत केली आहे. जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबन आणि उद्योगांचे प्रशिक्षण देत आहेत. सोबतच महिला सबलीकरणासाठी त्या मौखिक प्रबोधन करीत असतात. याशिवाय आधार – द हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजसेवा करीत आहेत. टाळेबंदीच्या काळात आणि कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितील त्यांना संस्था आणि वैयक्तिक पातळीवर गरजूंना मदत केली आहे. आपल्या मुलींनेही हा वारसा जपावा, अशी त्यांची इच्छा आहे.
आपल्या या सर्व व्यापातही लिखाणाची आवड त्या जपली. विविध विषयांवर विशेषतः सामाजिक मुद्द्यांवर काव्य, नाटिका यांच्याद्वारे त्या लिहीत असतात. यातूनच त्यांचा ङ्गसायलीची फुलेफ हा काव्यसंग्रह स्थानिक स्तरावर प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक कविवर्य नारायण सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे.

Exit mobile version