विद्यमान सदस्य गणेश भाऊ पाटील यांनी उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात लपविली गुन्ह्याची माहिती

तीन अपत्ये असतानाही प्रतिज्ञापत्रात दाखविली दोनच अपत्ये
निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार अलिबाग यांनी कारवाई न केल्यास अ‍ॅड. राकेश पाटील न्यायालयात जाणार
। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।
ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या सर्वात्रिक निवडणूकीमध्ये उमेदवार म्हणून गणेश भाऊ पाटील यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार अलिबाग यांच्याकडे सन 2019 च्या निवडणूकीमध्ये अर्ज सादर केला होता. सदरच्या निवडणूकीत गणेश भाऊ पाटील हे निवडून येऊन सद्य स्थितीत ते ग्रामपंचायत चिंचोटीचे विद्यमान सदस्य आहेत. गणेश पाटील यांनी निवडणूकीच्या वेळी सदस्य पदाच्या उमेदवारीच्या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केल्या प्रकरणी त्यांचे विरोधात भा. द. वि. कलम 420, 177, 171(ग), 198, 199, 200, 202, 203 नुसार गुन्हे दाखल करुन त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या बाबतीत अ‍ॅड. राकेश पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांच्यासह जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलिस अधिक्षक रायगड तसेच प्रधान सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केली आहे.
सदरच्या तक्रार अर्जात राकेश पाटील यांनी नमुद केले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या सार्वत्रिक निवडणुक सन 2019 मध्ये मु. चिंचोटी, ता. अलिबाग, जि. रायगड येथील रहिवासी श्री. पाटील गणेश भाऊ यांनी प्रभाग क्र. 2 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदरचे नामनिर्देशनपत्र दिनांक 7/02/2019 रोजी दाखल केले असून सदर उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमदेवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथ पत्रातील मजकुर ग्राह्य धरुन दिनांक 11/02/2019 रोजी सदर उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरविण्यांत आले होते व आहे. त्यानंतर निवडणूक घेऊन सदरच्या निवडणूकीत सदर उमेदवार गणेश भाऊ पाटील यांस विजयी घोषित केले. ग्रुप. ग्रामपंचायत चिंचोटीच्या सदस्य या पदावर गणेश भाऊ पाटील कार्यरत आहे.
गणेश भाऊ यांनी सादर केलेल्या निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदर उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या दि.07/02/2019 रोजीच्या शपथपत्रात खालीलप्रमाणे खोटे कथन केल्याचे आढळून आले.
सदर उमेदवार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथ पत्रातील कलम 14 अन्वये अपत्यांची संख्या 2 दाखवली असून सदर उमेदवारास 3 अपत्ये असल्याने सदर माहिती दडवून ठेवण्याच्या उद्देशाने शपथपत्रांमध्ये दोनच अपत्ये असल्याचे हेतू पुरस्पर व जाणीवपूर्वक नमूद केले आहे. कारण उमेदवाराच्या विरुद्ध निवडणूक होण्याच्या 12 वर्षापूर्वीच गुन्हा दाखल होऊन चार्चशीट कोर्टात दाखल होऊ केलेची सुनावणीही कोर्टात सुरु झालेली आहे. याची कल्पना माहिती उमेदवाराला होती व आहे.
ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य पदासाठी विजयी घोषीत केलेले उमेदवार श्री. पाटील गणेश भाऊ यांनी वाईट हेतूने त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये जाणीवपूर्वक खोटी माहिती देवून शासनाची व येथील मतदारांची फसवणूक केली आहे. तसेच दाखल केलेल्या शपथपत्रातील माहिती खोटी आहे हे माहित असूनही खरी असल्याचे कथन करुन सदर उमेदवाराने भा. द. वि. संहीता कलम अन्वये गुन्हा केला आहे. त्यामुळे गणेश भाऊ पाटील याचे विरोधात भा. द. वि. कलम 420, 177, 171(ग), 198, 199, 200, 202, 203 नुसार गुन्हे दाखल करुन सदस्यत्व रद्द करण्याच्या बाबतीत तक्रार अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुलांची 3असताना 2 नमूद केलीय तसेच दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती देणे हे अनिवार्य असतानाही निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देऊन निवडणूक आलेल्या गणेश भाऊ पाटील विरोधात तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांचे सदस्यत्व रद्द करुन शासनाने समाजासमोर नवा आदर्श उभा करावा.
– अ‍ॅड. राकेश पाटील, तक्रारदार

Exit mobile version