। मुंबई । प्रतिनिधी ।
‘कॅन्डिडेट्स’मध्ये पाच भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग असला, तरी त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. मात्र, अनुभवाच्या जोरावर कोनेरू हम्पी भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे आणि बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी व्यक्त केले.
भारताचे पाच बुद्धिबळपटू एकाच वेळी ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळणे हे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. प्रज्ञानंद, गुकेश आणि वैशाली यांनी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली असली, तरी ते खूप युवा आहेत. इतक्या वरच्या स्तरावर खेळण्याचा त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. आपले मानांकन सुधारण्यासाठी त्यांना ही स्पर्धा फायदेशीर ठरू शकेल.
विदित या स्पर्धेत भारताकडून सर्वात चांगली कामगिरी करू शकेल असे काही महिन्यांपूर्वी वाटत होते. मात्र, त्यानंतर त्याने कामगिरीत सातत्य राखलेले नाही. त्यामुळे सुरुवातीच्या फेर्यांमध्ये त्याला लय सापडणे आवश्यक आहे. भारताच्या पाच बुद्धिबळपटूंपैकी हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जाऊ शकतील. परंतु हम्पीची तयारी कशी आहे हे पाहावे लागेल. हम्पी खूप उच्च दर्जाची खेळाडू आहे. महिला विभागात कोणत्या एका खेळाडूचे पारडे जड वाटत नाही. त्यामुळे हम्पी चांगली कामगिरी करू शकेल, असे ठिपसे म्हणाले. असेच काहीसे मत गोखले यांनीही व्यक्त केले.
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेबाबत हम्पीकडून अपेक्षा

Businessman suit with chess board game. Plan stratgy and tactic concept