नव्या वर्षाचं स्वागत सर्वांनीच काल जल्लोषात केलं. वैयक्तिक आयुष्यात सर्वांनीच काही ना काही संकल्प केले असतील. रोज व्यायाम करणे, वजन कमी करणे इत्यादी. या संकल्पांनी आपले आयुष्य बदलून जाणार आहे याची आज तरी सर्वांना खात्री असेल. (या संकल्पांचे दहा दिवसांनंतर काय होईल ही वेगळी बाब.) आपल्या आजूबाजूलाही अनेक क्षेत्रात बदल व्हावेत असं सर्वांनाच वाटत असेल. उदाहरणार्थ, इथलं राजकारण. या राजकारणाने आपल्या आयुष्याचा बराच भाग व्यापलेला आहे. पण ते आता टीव्हीवरच्या रोजच्या मालिकेप्रमाणे झाले आहे. ठराविक पात्रे, त्यांचे ठराविक संवाद आणि कथानकही अजिबात न बदलणारे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात धरणीकंप झाला. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. एकनाथ शिंदे भाजपच्या वळचणीला गेले. पण त्यामुळे केवळ पात्रे बदलली. सत्तेत होते ते विरोधकांची आणि विरोधक सत्ताधार्यांची भाषा बोलू लागले. संतोष पवारांच्या यदाकदाचित नाटकात पांडव आणि कौरव यांच्या भाषेची सारखी अशीच सरमिसळ होत असते. पण सेना, भाजप किंवा राष्ट्रवादीचे जे काही चालू आहे ते नाटक नाही. ते वास्तव आहे. नवीन वर्षात ते बदलावे असेच कोणालाही वाटेल. म्हणजे, शिंदे यांनी हे लोकांचे सरकार आहे असे म्हणणे बंद करावे. त्यापेक्षा असे काही निर्णय घ्यावेत की लोकांना खरोखर हे सरकार आपले वाटावे. ठाकरे सरकार अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी होते हेही म्हणणे त्यांनी थांबवावे. कारण, दोन वर्षे ते त्याच सरकारात पहिल्या पाचातले मंत्री होते. दुसरीकडे शिवसेनेने आता गद्दार वगैरे शिव्या देणे बंद करावे. शक्य असेल तर आदित्य ठाकर्यांनी राहुल गांधींसारखी महाराष्ट्राची पदयात्रा करावी. राज्यात फिरावे. प्रश्न समजून घ्यावेत. संजय राऊत यांनी फक्त सामनामधून लेखणी चालवावी. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सतत मैदानात येण्याचे वगैरे आव्हान देणे बंद करावे. मुंबई पालिका निवडणुकीत आणि नंतर विधानसभेला वगैरे ते येणारच आहेत. आपले हिंदुत्व हे प्रबोधनकारांचे वारसा सांगते की बाळासाहेबांचा हेही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही आपण नेमके कोणत्या दिशेने जाणार आहोत याचा संभ्रम संपवावा. डिसेंबरमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांना आपल्यात येण्याचे आवाहन केले होते. त्यावर ते काहीच बोलले नव्हते. नंतर ते सरकारचे विमान घेऊन अनिल देशमुखांचे स्वागत करायला गेले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत असं विधानसभेत सारखं सांगत होते. अनेकांना ते उपरोधाने नव्हे तर कौतुकाने बोलत आहेत असं वाटतं. त्याचा वेळीच खुलासा झालेला ठीक राहील. शिवाय, प्रत्येक वेळी, अमुक तमुक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे म्हणणे दादांनी थांबवावे. म्हणजे, नागपूर भूखंड प्रकरणात शिंदे यांनी केलेले जमीनवाटप हा ज्याचा त्याचा प्रश्न असत नाही. एका जबाबदार व्यक्तीने केलेली ती गैर कृती असते. विरोधक म्हणून दादांनी आणि राष्ट्रवादीने त्याचा स्पष्ट निषेध करणेच आवश्यक असते. किंवा कर्नाटकाने मुंबई केंद्रशासित करावी असं म्हणणं हाही ज्याचा त्याचा प्रश्न असत नाही. मुंबईचा प्रश्न 1960 मध्येच निकालात निघालेला आहे हे त्यांनी ठणकावून सांगायला हवे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कोणी काही सांगू शकेल अशी स्थिती नाही. तरीही पक्षाची इतकी दुरवस्था असताना देखील ते जी भांडणे करतात ती पाहून विजय तेंडुलकरांच्या गिधाडे नाटकाचीच आठवण यावी. या कथानकाची पुढे फक्त शोकांतिकाच होऊ शकते हे त्या नेत्यांनी लक्षात घ्यावे. तिसरी आघाडी आणि डावे पक्ष यांना या स्तंभातून काही सांगावे असे काहीच नाही. त्यांना सर्व काही कळत असतेच. मात्र जे कळते ते, किमान या निवडणूकपूर्व वर्षात, वळायलाही लागावे इतकीच अपेक्षा बाळगता येईल. राहता राहिले भाजपवाले. 2014 मध्ये केंद्रात सत्तेत येण्यापूर्वीपासून तेच सतत काही ना काही आपल्याला सांगत आहेत. अच्छे दिन आयेंगे इथपासून आठ वर्षांमध्ये पुन्हा ‘हिंदू खतरे में’पर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे. त्यामुळे जे जे होईल ते ते पाहावे अशी वेळ आली आहे. येत्या काळात भाजपने आता जरा लोकांचेही ऐकावे. विरोधकांना नष्ट करून टाकण्याची इच्छा सोडावी. भारत-जोडोमध्ये लोक राहुल गांधींना बिलगत असतील किंवा राहुल हे दिल्लीच्या थंडीतही टी-शर्ट घालून वावरले असतील तर वावरू द्यावे. गलिच्छ टीका करू नये. खर्या हिंदू संस्कृतीला शोभेल असे वागावे. लोकशाहीची चाड ठेवावी. कोश्यारींसारखे राज्यपाल महनीय लोकांबद्दल वाटेल ते बोलत असताना आणि मराठी लोकांची लायकी काढत असताना त्यांना पाठीशी घालू नये. अयोध्येत राममंदिर झाल्यावर दुसरे प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत असं आश्वासन आपण दिलं होतं हे लक्षात ठेवावं. देशात धर्मांतरांचं कारस्थान चालू आहे हा बालिश प्रचार बंद करावा. अमित शाहांच्या म्हणण्यानुसार भाजप पुढील पन्नास वर्षं सत्तेत राहणार आहेच. तर मग 85 टक्के हिंदू बहुसंख्येनं मुस्लिम कसे काय होऊ शकतील हे स्वतःच स्वतःला विचारावं. शिवाय इक्बालच्या प्रार्थनेपासून ते दीपिका पदुकोनच्या बिकिनीपर्यंत सर्वत्र सर्व जण हिंदुंचा अपमान करायला टपलेले आहेत हा प्रचार बंद करावा. देशात बेरोजगारीचा आणि महागाईचा दर कधी नव्हे इतका वाढलेला आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशामध्ये पन्नास वर्षात झाली नव्हती अशी महागाई झाली आहे. युक्रेन युध्द चालूच असल्याने 2023 मध्ये जगभरात मोठी मंदी येण्याचा इशारा जाणकारांनी दिला आहे. नरेंद्र मोदी हे आपले नेते असले तरीही भारत या पृथ्वीवरच आहे. त्यामुळे या संभाव्य मंदीचा आपल्यालाही फटका बसण्याची भरपूर शक्यता आहे. भाजपवाल्यांनी भगव्या रंगाचा कुठे अपमान होतो आहे हे शोधत बसण्यापेक्षा त्याबाबत लोकांना मदत करावी. नवीन वर्ष सुखाचं नाही तरी कमी त्रासाचं जाईल. •
नविनाची अपेक्ष

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
by
Antara Parange
June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026