कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता
। उरण । वार्ताहर ।
रेवस-करंजा पूल उभारण्यात येत आहे. तसेच या मार्गावर सागरी रो-रो प्रकल्पही उभारण्यात येत आहे. मात्र रेवस-करंजा खाडी पुलाचे काम पूर्ण होवून वाहतुकीस खुला झाल्यानंतर रेवस-करंजा या जल मार्गावरील रो-रो सेवा चालणार का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या कामासाठी करण्यात येणारा सुमारे 45 कोटींचा खर्च पाण्यात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाचवेळी एकाच सोयीसाठी दोन प्रकल्पांवर खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
रेवस ते उरण तालुक्यातील करंजा दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 2 हजार 963 कोटी रुपयांचा ठेका अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला असून, कंपनी पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण करणार आहे. दरम्यान खाडी पूल उभारण्यास झालेल्या विलंबामुळे 44 वर्षात खाडी पुलाचा खर्च 2 हजार 663 कोटींनी वाढला आहे.
अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणार्या खाडी पुलाची चर्चा 1970 पासूनच सुरु झाली होती. त्यानंतर 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूदही केली होती. काही कामेही सुरु झाली होती. परंतु बॅ. अंतुले मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर 1982 मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यांनतर रेवस-करंजा खाडी पूल हे स्वप्नच राहिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेवस ते करंजा हा पूल दोन किती लांबीचा असून 4 लेन पूल उभारण्यात येणार आहे.
रो-रो सेवेची कामे रखडली
रेवस-करंजा दरम्यान रो-रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी करंजा व रेवस येथे रो-रो अनुषंगाने 2018 पासून कामे हाती घेण्यात आली आहेत. करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र ही कामे रखडल्याने कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र रेवस बंदरावरील कामे रखडली आहे. रेवस जेट्टी येथील कामाचा खर्च 25 कोटींवरुन 30 कोटींवर पोहोचला आहे.
रो-रो सेवा चालणार का?
रेवस-करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस ते करंजा दरल्यान अंतर वाहनाने दहा मिनिटांच्या आत पार करणे सहज शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रो-रो जहाजात वाहने पार्क करणे, त्यानंतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो-रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.