कारखान्यांमध्ये मात्र स्वच्छता ठेवण्याला विक्रेते देताहेत प्राधान्य
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
खुल्या मिठाईवरही एक्स्पायरी डेट टाकणे बंधनकारक करण्यात आलेले असून देखील पनवेल परिसरातील अनेक विक्रेत्यांनी मात्र या नियमाला बगल दिल्याचे पाहायला मिळत आहेत. मिठाई तयार करण्याचे कारखाने मात्र स्वच्छ व टापटीप ठेवण्याला दुकानदारांनी भर दिल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले आहे.
दिवाळीनिमित्त एकमेकाला गोडधोड पदार्थ भेट देण्याची प्रथा असून, मिठाई खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याने मिठाईच्या मागणीतदेखील वाढ होत असल्याने विक्रेते नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मिठाई तयार करण्यास प्राथमिकता देत असतात. काही दिवस अगोदरच तयार करण्यात येणारी ही मिठाई अनेकदा खराब होण्याची शक्यता असल्याने पाकीटबंद खाद्यपदार्थांवर उत्पादन तारीख आणि ते कधीपर्यंत वापरावे (एक्स्पायरी डेट) याची तारीख टाकण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) याबाबतचा आदेश काढला आहे. दुकानांमध्ये पेढे, बर्फी, लाडू, जिलेबी, कलाकंद, गुलाबजाम यांसह विविध प्रकारची मिठाई खुल्या पद्धतीने विकली जाते. ती ग्राहकांना दिसावी म्हणून काऊंटरमध्ये आकर्षकपणे मांडलेली असते. मात्र, ती कधीपासून ठेवलेली असते, याबाबत ग्राहकाला माहिती नसते. ती शिळी असल्यास ग्राहकांच्या आरोग्याला त्यापासून धोका उद्भवू शकतो. त्यामुळे खुल्या मिठाईवर बनविण्याच्या तारखेसह ती कधीपर्यंत वापरावी याचा उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न आणि सुरक्षा मानक प्राधिकरणाने हा निर्णय जाहीर करूनदेखील दुकानदार मात्र या निर्णयाची अंमलबजावणी योग्य रीतीने करत नसल्याने अशा दुकानदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
कारखान्यात स्वच्छता वाढली
दसरा-दिवाळी येताच सर्वत्र मिठाई बनविण्याचे अस्वच्छ कारखाने आणि तेथील गलिच्छ वातावरणाची चर्चा होत असते. यंदा मात्र कारवाईच्या भीतीने मिठाई बनवण्याच्या कारखान्यांमधील अस्वच्छता व गलिच्छपणा काही प्रमाणात कमी झाला असून, विक्रेतेदेखील हॅग्लोज वापरण्यासोबत डोक्यावर पारदर्शक टोपीचा वापर करताना दिसत आहेत.