। तळा । वार्ताहर ।
शासनाने शासकीय कर्मचार्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुका पातळीवरील तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयात कर्मचार्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा लावण्यात यावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा येत असल्याचे दिसून येत आहे. हजेरी नोंदवहीवर सही करून कर्मचारी निघून जाऊ नये, यासाठी शासनाने कार्यालयात सकाळी येतेवेळी व सायंकाळी जातेवेळी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, तळा तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अधिकारी व कर्मचार्यांचे फावत आहे. कोरोना काळात संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकारी व कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. याचा गैरफायदा कर्मचारी घेत आहेत. यामुळे बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालय, गटशिक्षण अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, तालुका कृषी व कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांसह अनेक इतरही कार्यालयांमध्ये नवीन कार्यालयीन वेळेनुसार क्वचितच अधिकारी निर्धारित वेळेत हजर झालेले पाहायला मिळत आहेत.