| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
कोल्हापूरहून सिंधुदुर्गात येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर फोंडा घाटात खिंडीपासून अर्धा कि. मी. अंतरावरील घोडतळीनजीकच्या दुसर्या वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. उलटल्यानंतर या टँकरचा स्फोट होऊन टँकरने पेट घेतला. त्यात टँकर खाक झाला, पण या अपघातात टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 4) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. त्यात टँकर खाक झाला, पण या अपघातात टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फोंडाघाटातील आणि दाजीपूरमधील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कोल्हापूरकडे जाणारी व सिंधुदुर्गकडे येणारी वाहतूक सुमारे दीड तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या तीन-तीन कि. मी. च्या रांगा लागल्या होत्या. कणकवली न. पं. च्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले होते. अपघात घडला त्यावेळी मोठ्या स्फोटचा आवाज झाल्याची माहिती दाजीपूरमधील काहीजणांनी दिली. काहीजण खिंडीजवळ उभे होते, तेही आवाजाच्या दिशेने खाली आलेत. सुदैवाने घाटात ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. जर वस्तीच्या ठिकाणी ही घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. हा टँकर सिंधुदुर्गातीलच असल्याचे समजते.