इलेक्ट्रीक वस्तूंसह कार, दुचाकी खरेदीवर सवलती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गुढीपाडव्यानिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑफरचा धमाका सुरु झाला आहे. इलेक्ट्रीक वस्तूंसह कार व दुचाकी खरेदीवर वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी नवीन वाहने, सुवर्णालंकार आणि घर खरेदीवर सवलती उपलब्ध आहेत. त्यामुळे वस्तूंसह साहित्याच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मांगल्य व आनंदाचे प्रतिक तसेच मराठी वर्षातील पहिला सण म्हणून गुढीपाडवा या सणाकडे पाहिले जाते. या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केल जाते. तसेच, या दिवशी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. काहीजण जागा, घर, तर काही जण दुचाकी, चारचारी खरेदी करतात. तसेच काही जण आपल्या परीने सोने खरेदी करतात. यावर्षी गुढीपाडवा गुरुवारी (दि.19) आहे. या निमित्ताने ग्राहकांसाठी विक्रेत्यांनी वेगवेगळ्या ऑफर लागू केल्या आहेत. शुन्य डाऊन पेमेंटवर लॅपटॉप, काही ठिकाणी 7.5 टक्के कॅश बॅक ऑफरवर एसी, काही ठिकणी शुन्य डाऊनपेमेंटवर एसी उपलब्ध आहेत. दुचाकी खरेदीवर 3 ते 4 हजार रुपयांची सवलत ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी कमी डाऊन पेमेंट आणि जास्त फायनान्सची ऑफर सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ऑफरचा धमाका सुरु झाला आहे. सुरु करण्यात आलेल्या या सवलतींचा फायदा ग्राहक नक्कीच घेतील, असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आला असून यावर्षी खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असे ही त्यांनी सांगितले.







