आवक वाढल्याने आंब्याची निर्यात

आखाती देशातून मागणी
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
वाशीतील एपीएमसी बाजारात आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत मार्च मध्ये अधिकपटीने आंबा दाखल होत असल्याने निर्यातीला वेग आला आहे. मागील वर्षी मार्च मध्ये 30%ते 40% आंबा निर्यात होती. तेच यावेळी 60% निर्यात होत असून रमजान निमित्ताने आखाती देशात मागणी वाढली आहे , अशी माहिती आंबा निर्यातदार यांनी दिली आहे.

यंदा हापूस आंब्यांचे जास्त उत्पादन होईल अशी अशा व्यापार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली. हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी हापूस तोडणीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारी -मार्चमध्ये तीन ते चार पटीने आंब्याची आवक आहे. एपीएमसी बाजारात सोमवारी 81 हजार पेट्या दाखल झाल्या होत्या तर आज बुधवारी 70 हजार 600पेट्या दाखल झाल्या असून प्रति पेटी दर मात्र 1500 रुपये ते 4000रुपयांवर स्थिर आहेत.

बाजारात हापूस मुबलक प्रमाणात दाखल होत असल्याने आंबा निर्यातीला वेग आला आहे. एपीएमसी बाजारात आतापर्यंत 60% आंबा निर्यात होत आहे. आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत याठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्याना जास्त प्रमाणात मागणी असते. आखाती देशात हापुस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटी तून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन, आणि दर्जा महत्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापुस निर्यात करण्यासाठी त्याचा दर्जा टिकवून ठेवणे हे भूमिका महत्वाची असते.

विविध प्रक्रिया करून, आंब्याची गुणवत्ता तपासणी करून ,विशिष्ट तापमान ठेवून दीर्घकाळ टिकण्यासाठी विविध प्रक्रियेतून आंब्याला जावे लागते त्यांनतर त्याची निर्यात करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आंब्याच्या वजन ग्रॅम नुसार विक्री होते. यंदा बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होत आहे. त्यामुळे आंब्याची निर्यातही वाढली आहे . हापूसची 60 टक्के निर्यात होत आहे.

Exit mobile version