पत्रक वाटप केल्याने झाला वाद; संकेत पाटील यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आपल्या जागेच्या प्रश्नांबाबत वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे संकेत पाटील यांनी सोमवारी ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये काही सदस्यांना पुराव्याचे पत्रक वाटप केले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राऊत यांनी रोखून संकेत पाटील आणि त्यांच्या आईला हाकलून दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. संबंधिताविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, सभा चालू असताना कोणतीही परवानगी न घेता पत्रक वाटप करीत होते. त्यांना रोखले. त्यानंतर त्यांना जाण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले.
संकेत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील पालव येथे त्यांच्या जागेमध्ये खातरजमा न करता, ग्रामपंचायतीने असेसमेंट उतारा लावला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्याने 24 नोव्हेंंबरला ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या ग्रामसभेत न्याय मागण्यासाठी संकेत पाटील आणि त्यांची आई असे दोघेजण ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. ग्रामपंचायतीच्या सभागृहात चालू असलेल्या सभेमध्ये पुराव्यांचे कागद संकेत हे सभासदांना वाटप करीत होते. त्यावेळी ग्रामसेवकांनी हरकत घेतली. संकेत आणि त्यांच्या आईला पत्रक वाटप करण्यास मनाई केली. हातवर करून बोट दाखवून त्यांना आणि त्यांच्या आईला सभेतून हाकलून आहे. संकेत यांच्या आईला योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार केली आहे. चौकशी करून संबंधिताविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
मागील महिन्याभरापासून रेवदंडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कामकाज हाती घेतले आहे. संकेत पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत त्यांना स्पीड पोस्टाने पत्र देण्यात आले आहे. खासगी जागा असल्याने मोजणी करून घेण्यात यावी, असेही त्यांना सांगितले आहे. सोमवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोणतीही परवानगी न घेता, ते पत्रक वाटप करीत होते. त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. बैठक सुरू असल्याने संकेत यांनाच जाण्यास सांगितले. त्यांच्या आईला हाकलून दिले नाही. ते माझ्यावर चुकीचा आरोप करीत आहेत.
-सुदेश राऊत
ग्रामविकास अधिकारी, रेवदंडा
पालव येथील माझ्या जागेच्या प्रश्नांबाबत पाच ते सहा जणांना पत्रक वाटप केले. ग्रामसेवकांनी पत्रक वाटप करण्यास रोखले. तुम्हा मतदार नाहीत. त्यामुळे पत्रक वाटप करू शकत नाही. चालायला लागायचे असे सांगून मला आणि माझ्या आईला ग्रामपंचायत कार्यालयातून हाकलून दिले.
-संकेत पाटील,
तक्रारदार







