। मुंबई । प्रतिनिधी ।
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चर्चा आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 20 जुलै रोजी नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित कॅबिनेट विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यावरुन विरोधकांनी टीकेचा सूर लावला होता. मात्र पुढच्या चारच दिवसात शिंदे-फडणवीसांच्या साथीला जवळपास बारा मंत्री येणार असल्याचं बोललं जातंय.
पावसाळी अधिवेशनापूर्वी शपथविधीचा पहिला टप्पा होईल. यावेळी कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं. पहिल्या टप्प्यात म्हणजेच येत्या 20 तारखेला भाजपकडून पाच ते सहा जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची चिन्हं आहेत. तर शिंदे गटातूनही पाच ते सहा जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिंदे गटातून पहिल्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.