सेक्सटॉर्शनचा फंडा वापरून लाखोंचा गंडा

पनवेलमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

| पनवेल | वार्ताहर |

आजच्या तरुण पिढीला गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या ‘सेक्सटॉर्शन’चा नवा फंडा वापरून अनेक गरिबांनादेखील लाखोंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. समाजातील इभ्रतीला घाबरून अशा घटनांमध्ये फसविले गेलेले बहुतांश जण पोलिसात तक्रार देत नाहीत. सोशल मीडियातील फेक अकाऊंटवरून गुन्हेगार डाव साधत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.

वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाइलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर ललनेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्यानंतर, औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडीओ कॉलिंग सुरू होते. अश्‍लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर पैशांची मागणी होते. नकार दिला तर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आणि चॅटिंग व्हायरल करून बदनामी करायची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग केले जाते. अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात आणि लाखो रुपयांना फसविले जातात.

सुरुवातीला या प्रकारच्या जाळ्यात सेलिब्रिटी, राजकारणी, इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना ओढले जात होते. फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील अ‍ॅप्सचा वापर करून हा गोरखधंदा केला जातो. आता तर सेक्सटॉर्शनचे लोण पनवेलच्या ग्रामीण भागातही पसरले आहे. सेक्सटॉर्शनचे ग्रामीण व्हर्जन म्हणजे हनी ट्रॅप. या प्रकारात महिलांचा वापर करून पैसेवाले सावज जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर, सावजाकडून पैसा उकळला जातो. प्रसंगी सावजाला बदनामीची धमकी दिली जाते. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही हनी ट्रॅपचे लोण पसरत चालले आहे. यातून अनेक जणांनी आत्महत्या केलेले आहेत. अशाप्रकारे कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा यावरचा उपाय नाही. घडलेल्या प्रकाराची माहिती जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना द्या आणि पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सावधानता बाळगा
कोणत्याही अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारल्यास त्यांना व्हॉट्सप क्रमांक देऊ नये. कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नका. खासगी विषयावर कुठलाही संवाद करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. असे केल्यास तुमचा व्हिडीओ कॉल आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला बदनाम करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी होईल. त्यामुळे अशा फसव्या कॉलपासून अधिक सतर्क राहा. पनवेल तालुक्यातील कित्येक 18-25 वयोगटातील मुलांना या गोष्टी भोगायला आल्या आहेत. काहींनी तर गळफास लावून जीवन संपविले तर काहींनी विष प्राशन करून स्वतःला संपवलं तर काहींनी रेल्वेच्या रुळावर जाऊन जीवन संपविले आहे. आजकालच्या तरुणांमध्ये हे सर्व जनजागृती करणे गरजेचे आहे.
Exit mobile version