आचार्य कॉलेजकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक

बहुजन विद्यार्थी संघटनेचा हल्लाबोल
। वावोशी । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील शेलू येथील जी. व्ही. आचार्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त प्रवेश फी घेऊन स्कॉलरशिप अडवणे, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव, कागदपत्रांची अडवणूक करून विद्यार्थ्यांची पिळवणूक करणार्‍या या कॉलेज प्रशासनाविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

प्रवेश घेताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रमाणात पैसे घेतले जात आहेत. याच महाविद्यालयामध्ये राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती ईबीसी म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी मिळणारी शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तींचा सरकारकडून महाविद्यालयाला परतावा झाला असताना सुद्धा महाविद्यालयाने दोन ते तीन वर्षाच्या शिष्यवृत्ती स्वतःकडेच राखून ठेवल्या. त्या अद्याप विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच महाविद्यालयाचे प्रशासन हे विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रदेखील स्वतःकडे अडवून ठेवत असून विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती या महाविद्यालयाकडून केली जाते. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संपूर्ण शुल्क भरून सुद्धा त्यांना मिळणार्‍या सुविधा दिल्या जात नाहीत.असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना जिमखाना नाही. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. जे शौचालय आहेत, त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. त्यातच प्रशिक्षित शिक्षकांचा भरणा देखील या महाविद्यालयात कमी आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांकडून फी संपूर्ण घेतली जाते; परंतू सुविधा मात्र विद्यार्थ्यांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या बहुजन विद्यार्थी संघटनेकडून शेलू येथील जी. व्ही. आचार्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या या प्रश्‍नासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जर प्राचार्यांनी दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक केली नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी दिला आहे. यावेळी सुजल गायकवाड, मारुती देवघरे, ऋत्विज आपटे, धर्मेश परमार, यश दीक्षित, संकेत चव्हाण, ऋग्वेद सोनवणे, प्रज्ञेश खेडकर, केवल दहिवलीकर, संदीप वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version