। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानच्या थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यासाठी माथेरान ते दस्तुरी नाका या मिनीट्रेन मधून प्रवास करण्याची इच्छा असते. त्यासाठी मिनीट्रेन च्या शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डब्बे जोडण्याची मागणी माथेरानकरांनी केली आहे. मध्यरेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
माथेरानचे पर्यटन हे मिनी ट्रेनवर अवलंबून असते. बर्याच पर्यटकांना डब्ब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता शटल सेवा ही आठ डब्यांची करण्यात यावी तसेच शनिवार रविवार प्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा तात्काळ चालू करण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात यावेत जेणेकरून येणार्या पर्यटकांची सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नात देखील भर होईल.
माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, प्रसाद सावंत, कुलदीप जाधव यांनी मध्य रेल्वेचे मुंबई विबीभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे निवेदन मध्य रेल्वे व्यवस्थापकी गोयल यांना देण्यात आले. गोयल यांनी संबधित विभागाला आदेश देऊन पहिल्या टप्यात सोमवार 16 मे ते 20 मे दरम्यान शनिवार रविवार प्रमाणे दहा फेर्या सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लवकरच मॅकेनिकल विभागाकडून आठ डब्यांची चाचणी घेऊन त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे. गोएल यांचे मिनी ट्रेनसाठी कायम सकारात्मक भूमिका राहिली असून, मध्य रेल्वे व्यवस्थापक यांचे प्रोटोकॉल इन्स्पेक्टर अजित म्हसाळकर देखील उपस्थित होते.जागतिक वारसा लागलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशा आशावाद गोयल यांच्या या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे.







