उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट !

1200 हेक्टर पैकी 120 हेक्टरवर भातपिक उभे; गुरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न ऐरणीवर

। माणगाव । वार्ताहर ।

रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र डोलवहाळ बंदार्‍यातील कालवा ठीकठिकाणी नादुरुस्त झाला आहे. तर शासनाकडून या कालव्याची साफसफाई करण्यासाठी पुरेशी यंत्र सामुग्री मिळत नसल्याने माणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. त्यामुळे नागरिक, शेतकर्‍यातून कमालीची चिंता पसरली आहे. शेती विविध कारणांनी अडचणीत येवू लागली आहे. काही शेतकर्‍यांनी भात पिकाऐवजी कडधान्ये मोठ्या प्रमाणात पिकवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आधीच औद्योगिकीकरणामुळे शेती अडचणीत सापडली असून उरली सुरली शेतीमध्ये उन्हाळी भात पीक घेण्याकडेही शेतकर्‍यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे 1200 हेक्टर पैकी 120 हेक्टरवर भातपिक माणगाव तालुक्यात उभे असून 1080 हेक्टरवरील भातपिकाला फटका बसला असून गुरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे.

तालुक्यात बहुतांशी ठिकाणी भात कापणीला सुरवात झाली आहे. रब्बी हंगामातील भाताचे पीक हे शाश्‍वत पिक म्हणून शेतकरी या मुख्य पिकाकडे मोठया प्रमाणात वळतो. मात्र यंदाच्या वर्षी काळ प्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने माणगाव तालुक्याला भाताचे कोठार म्हणून असलेली ओळख यंदाच्या वर्षी पुसट होत आहे. दिवसेंदिवस भाताचे रब्बी हंगामातील भात पिकाचे क्षेत्र घटत आहे. ही रायगड जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. यंदाचे वर्षी 120 हेक्टरवर भात लागवड केली आहे. माणगाव तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली असून यंदा भात पिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपली आहे. तर यंदाचे वर्षी 1350 हेक्टरवर कडधान्ये शेतकर्‍यांनी लावले होते. कोकणातील माणसांचे मुख्य अन्न भात हे असून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदाचे वर्षी 120 हेक्टर म्हणजेच 300 एकरवर भात पिक लावणी झाली आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जात होते. दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत असून सध्या स्थितीत कालवा पाण्यामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र पडून आहे.

गेल्या वर्षी सन 2022-2023 मध्ये हेक्टरी उत्पादन 40 क्विंटल प्रमाणे 44 हजार 400 क्विंटल सरासरी उत्पन्न शेतकर्‍यांना मिळाले होते. गेल्यावर्षी सन 2022-23 मध्ये 98 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या उत्पादनात घट होवून 38 क्विंटल उत्पादन मिळू शकले. म्हणजेच 2940 क्विंटल उत्पादन शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित होते. पर्यायाने तालुक्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असून याचा फटका जिल्ह्याच्या बाजारपेठेलाही बसणार आहे. भात या मुख्य पिकाबरोबरच शेतकर्‍यांनी कडधान्याचे पिकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे.

यंदा वाल 700 हेक्टर, मूग 350 हेक्टर, हरभरा 200 हेक्टर, मटकी 100 हेक्टर एकूण 1350 हेक्टर तर कलिंगड 500 हेक्टर, भाजीपाला 100 हेक्टरवर पिक घेतले. दरवर्षी 15 डिसेंबर रोजी कोकण हंगाम पिकासाठी काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगावमधील शेतीला सोडण्यात येते. यंदाचे वर्षी हे पाणी 5 जानेवारीला कालव्याला दरवर्षी पेक्षा 20 ते 25 दिवस उशिरा सोडल्यामुळे शेतकरी नाराज होता. उन्हाळी भात पिक हे शाश्‍वत पिक म्हणून शेतकरी पाहतो. त्याचबरोबर गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यंदाचे वर्षी माणगाव तालुक्यात भात पिकाची लागवड 120 हेक्टर क्षेत्रावर केली यंदा भाताची क्षेत्र कमी झाले असले तरी कडधान्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदा कडधान्य चवळी, वाल, मुग, त्याचबरोबर कांही शेतकर्‍यांनी तूर, उडीद, हरभरा भुईमुग, तीळ तसेच भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. तसेच शेती व्यावसायाला पूरक नगदी पिक म्हणून कलिंगड मोठ्या प्रमाणात पिकवले आहे. भाताची ओळख माणगावची पुसट होत असली तरी कडधान्य आणि कलिंगडाच्या विक्रमी उत्पादनातून ती ओळख गडद होत आहे.

Exit mobile version