मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ


। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांच्या पाणी साठा हळूहळू वाढत आहे. सध्या झालेल्या पावसामुळे मुंबईत जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील दीड महिना तरी मुंबईकरांची पाण्यासाठीची चिंता मिटली आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सतत कोसळणार्‍या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांचा समावेश होते. या धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार 800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. सततच्या पावसामुळे तलावांमध्ये एकूण एक लाख 85 हजार 981 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

Exit mobile version