अलिबाग येथे नेत्रसेवा केंद्र सुरू

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अक्षय्य तृतियाच्या शुभमुहूर्तावर अलिबाग येथील डॉ. रीटा धामणकर व पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सुहास हळदीपुरकर यांच्या पुढाकाराने डॉ. धामणकर हॉस्पिटल अलिबाग येथे नेत्रसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या नेत्रपेढी मुळे अलिबाग परिसरातील नेत्रदान करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध झाली आहे.

यावेळी नेत्रदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग येथील डॉक्टरांना प्रशिक्षण व मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व या चांगल्या कार्यास लागले ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सुहास हळदीपूरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. निशिगंध आठवले, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर, डॉ. रिटा धामणकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुहास हळदीपुरकर यांनी मार्गदर्शन करताना नेत्रदानाचे महत्त्व आणि आवश्यक त्या खबरदारी याविषयी अधिक माहिती दिली. याप्रसंगी डॉ. निकेत गांधी, अंनिस कार्यकर्ते सुहास पानसकर, संध्या कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार रिटा धामणकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राची कुबडे देशमुख यांनी केले. यावेळी नेत्रदान उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या अनिल आगाशे तसेच आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांचा गौरव करण्यात आला. सदर नेत्रदान उपक्रमास इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग व रायगड मेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य लाभणार आहे.

Exit mobile version