दृष्टीसाठी नेत्रदान एकमेव माध्यम

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जोशी यांचे प्रतिपादन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मृत्यूपश्‍चात नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी मदत होते. समाजामध्ये अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी नेत्रदान हे एकमेव माध्यम आहे. नेत्रदान करून दोन अंध व्यक्तीस दृष्टी देण्यास मदत करावी असे आवाहन केले. नेत्रदान प्रक्रिया जिल्हा रुग्णालय व सेवाभावी संस्थेच्यावतीने सुलभ होत असून याचा सकारात्मक प्रतिसाद रायगड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी- घुगे यांनी केले.

नेत्रदान पंधरवडाचा शुभारंभ नुकताच रुग्णालयात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये साजरा होणारा 39 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्‍वर महाजन, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अजय इंगळे, अधिसेविका गायत्री म्हात्रे, सहाय्यक अधिसेविका अनिता भोपी, परिसेविका मालती मोकल, सुविधा दवटे, स्मिता जोशी व परिचारिका आदी उपस्थित होते. नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अजय इंगळे नेत्रदान पंधरवडानिमित्त नेत्र विभागाच्यावतीने घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धेची माहिती दिली. आरोग्य विभागाच्यावतीने नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागचे उद्दिष्टदेखील स्पष्ट केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्‍वर महाजन, डॉ. चेतना पाटील यांनीदेखील नेत्रदानाबद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गोरे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे लेखापाल रुपेश म्हात्रे, अधिपरिचारिका मनीषा गावंड, कविता गोळे आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version