जी.एस. हरलय्या यांचे प्रतिपादन
| पेण | प्रतिनिधी |
पेणच्या गणरायाला नुकतेच जीआय मानांकन मिळाल्यामुळे मूर्तिकार आणि कारागिरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे कारखानदारांनी आता एकजूट होणे गरजेचे असून, शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून समूह लघु उद्योगद्वारा योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवायचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्स्थापक जी.एस. हरलय्या यांनी केले. पेणमधील गणपती कारखानदारांची बैठक मंगळवारी रामेश्वर हॉल येथे घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरलय्या, डॉ. अविनाश कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी गणेश मूर्तिकार व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर, उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सागर सदाशिव पवार, दीपक समेळ, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी हरलय्या यांनी सांगितले की, जिल्ह्यातील उद्योगाचा विकास व्हावा या दृष्टीने गणपती मूर्तिकारांचा ऐतिहासिक ठेवा असून, आर्थिक, भौगोलिक, सामाजिक माहिती शासनाला पुरवून पेणच्या गणपतीला जी.आय मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, डॉ. अविनाश कुलकर्णी यांचे कार्य मोलाचे ठरले आहे. या जीआय मानांकनाद्वारे गणपती व्यावसायिकाला एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, आता रायगड जिल्ह्यातील बिगर कृषी घटकात जीआय मानांकन प्राप्त झालेला व्यवसाय आहे.
यावेळी अविनाश कुलकर्र्णी यांनी सांगितले की, या उद्योगाशी संबंधित गोष्टींचा मी अभ्यास करून शासनाला माहिती पुरवली व आज या व्यवसायाला जीआय मानांकन मिळाले. या उद्योगाला चालना मिळण्यासाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे आहे. यावेळी श्रीकांत देवधर यांनी गणेशमूर्ती व्यवसायाला जीआय मानांकन मिळवून देण्यात डॉ. अविनाश कुलकर्णी, जिल्हा महाव्यवस्थापक जी.एस. हरलय्या यांचे आभार मानत यापुढे गणेश मूर्तीकार संघटनेच्या सदस्यांनी एकत्रित येऊन एक नवीन कार्यालय सुरु करावे, या माध्यातून शासकीय, बँकिंग व्यवहार सुलभ होण्यास मदत होईल, प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय सहज व सुलभरित्या करण्यास मदत होईल, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील व सचिव सागर पवार गणेश मूर्तिकारांच्या उत्कर्षासाठी ते नेहमी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. किरण पाटील यांनी शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
उद्योगाचा विकास व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन मिळून अनुदान मिळते. त्याचा लाभ मूर्तिकारांनी घ्यावा. जीआय मानांकनामुळे आता पेणचे गणपती सांगून अनेक राज्यात गणपती मूर्तीची जी विक्री होते, त्याला आळा बसणार आहे.
जी.एस. हरलय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
