। मुंबई । वृत्तसंस्था ।
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्याबरोबरच राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरुन घेरलं आहे. भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात ‘ओबीसी बचाव’च्या टोप्या घालून प्रवेश केला आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही हीच टोपी घातली आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोंडसुख घेताना म्हटलंय की, आमची भूमिका सहकार्याचीच आहे. पण राज्य सरकार सिरियस आहे का? भुजबळांवर दबाव आहे का की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवायच व्हायला हव्यात? तुम्ही टोपी घातली पण तुम्हाला कुणी टोपी घातलीय का? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, मात्र, तुम्ही सरकारला जाब विचारायलाच हवा.
पुढे त्यांनी सरकारच्या चुकांचा पाढा वाचून दाखवताना त्यांनी म्हटलंय की, अंतरिम अहवाल सादर करताना काल सरकारची दमछाक झाली. एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय व्हायला नको. आमच्या समाधानाकरता मंत्रिमंडळाचे ठराव घेऊ नका. त्यासारखं वागा. तिकडे निवडणुकांवर निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुका अशाच पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
पुढे त्यांनी म्हटलंय की, कोर्टाने म्हटल असेल तर नवीन आयोग नेमणूक करा, दोन महिन्यात काम होईल मात्र, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलली पाहिजे. एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये, याची काळजी घ्या. मात्र, काहीही करुन या आरक्षणासाठी प्रयत्न झालेच पाहिजे. त्यासाठी आज पूर्ण दिवस यावर चर्चा झाली तरी हरकत नाही.
विधानसभेत OBC आरक्षणाबाबत फडणवीस आक्रमक
