| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री व्हायचे होते. याची कबुली त्यांनी मला दिली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत अँटॉपहिल येथे केला.
मुंबईत अँटॉपहिल भागात महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, ‘मातोश्री’वरील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीचा ‘कुठली तरी खोली’ असा उल्लेख केल्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर ‘नालायक माणूस’ अशा शेलक्या शब्दांत टीका केली. त्यांचे बिंग मी फोडल्याने त्यांची चरफड झाल्याचेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपचे तत्कालीन अध्यक्ष तसेच विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘मातोश्री’त बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत दिले होते, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.
या भेटीनंतर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी मी तयार करतो, असे सांगितले तेव्हा ‘आदित्य अजून लहान आहे. मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात पण घालू नका. आदित्यला मुख्यमंत्री करून तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम करणार का?’ असा प्रश्न मी फडणवीसांना केला होता. त्यावेळी ‘वर केंद्रात जाऊन मी अर्थमंत्री होईल,’ असे ते मला म्हणाले होते, अशी खळबळजनक माहिती ठाकरे यांनी या सभेत दिली. भाजपच्या नेत्यांनी मात्र ठाकरे यांच्या आरोपांचे खंडन करताना त्यांचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
‘आम्हाला बदनाम केले’ सध्या राज्य सरकार कंत्राटदारांच्या माध्यमातून मुंबईची लूट करत आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेने अतुलनीय काम केले होते. एकावेळी सव्वा लाख लोकांना ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्ध करून दिले होते. यामुळे कोरोना काळात ‘सर्वोत्तम मुख्यमंत्री’ म्हणून माझी गणना झाली होती. तरीसुद्धा आम्हाला बदनाम करण्यात आले असल्याचे ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दांचे पक्के होते. ते कधीच मागे हटत नव्हते. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीच विचार केला नाही. ते आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एक कपोलकल्पित कथानक तयार करून उद्धव ठाकरे आपण कोणाची दिशाभूल करता? स्वतःचीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण ही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. ती तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल.
देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री